मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या तापमानात विविध बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. रात्री गारवा तर दिवसा उन्हाचे चटके यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. सध्या मुंबई व राज्याच्या इतर भागांमध्ये गारवा अनुभवायला मिळत आहे. पण येत्या 24 तासांमध्ये राज्याच्या किमान तापमानात दोन ते चार अंशांनी वाढ होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे आता नागरिकांना मे महिन्याच्या आधीच उकाड्याचा त्रास सहन करावा लागणार आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये पावसाला पोषक स्थिती निर्माण झाल्याने त्याचा परिणाम महाराष्ट्रातील तापमानावर होत असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. (Maharashtra Weather Temperature will rise in the state)
प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यात पुढील पाच दिवस आकाश स्वच्छ व हवामान कोरडे राहणार असल्याची शक्यता आहे. पुढील दोन दिवसात कमाल तापमानात एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढ होऊन किमान तापमान दोन ते तीन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. तर, पुण्यात 12 ते 16 अंश सेल्सिअसपर्यंत किमान तापमानाचा पारा गेला होता. सातारा, सोलापूर येथील तापमान 20 अंश सेल्सिअसपर्यंत जाऊन स्थिरावले. नाशिकच्या कळवणमध्ये 15 तर विल्होलीमध्ये 20 अंशांची नोंद झाली. मुंबईतील कुलाब्यात 21.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद मंगळवारी (ता. 28 जानेवारी) करण्यात आली होती. तर सांताक्रुझ येथेही 19.9 अंश सेल्सिअस तापमान नोंदविण्यात आले.
तसेच, संपूर्ण राज्यातही किमान तापमानात 1 ते 3 अंशांनी वाढ होत असल्याचे नोंदविण्यात येत आहे. त्यामुळे येत्या 24 तासांमध्ये तापमानात वाढ होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. तर, दक्षिणेकडील राज्यांमध्ये ईशान्य मान्सून सक्रिय झाल्याने या राज्यांना पावसाचा तडाखा बसणार आहे. तर उत्तरेकडील राज्यांमध्ये पश्चिमी चक्रवात सक्रिय झाल्याने प्रचंड थंडीसह तुरळक ठिकाणी पाऊस होणार असल्याचा सांगण्यात आले आहे. दक्षिण व उत्तरेकडील तापमानात होणाऱ्या चढउतारांमुळे राज्यात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याशिवाय, हवामानही कोरडे राहणार असून थंडीचा जोर ओसरणार आहे.