Maharashtra Bandh: लखीमपूर हिंसाचार विरोधात ११ ऑक्टोबरला महाराष्ट्र बंदची हाक

maharashtra will remain closed on october 11 against the incident of lakhimpur kheri violence

उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी हिंसाचारचे पडसाद संपूर्ण देशात पडताना दिसत आहे. याप्रकरणी सर्व विरोधी पक्षाने केंद्र आणि राज्य सरकारला घेरले आहे. यादरम्यान महाविकास आघाडीने लखीमपूर हिंसाचार विरोधात महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले की, लखीमपूर हिंसाचार विरोधात महाविकास आघाडीने येत्या ११ ऑक्टोबरला राज्यव्यापी बंदचे आवाहन केले आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने माहिती देत सांगितले की, ‘महाराष्ट्र मंत्रिमंडळाने उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी हिंसाचार घटनांमधील दुर्दैवी मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचा शोक व्यक्त करण्यासाठी एक प्रस्ताव पारित केला. यावेळी मंत्रिमंडळात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहिली.’

जयंत पाटील म्हणाले की, ‘आज मंत्रिमंडळात याप्रकरणाचा खेद व्यक्त करून श्रद्धांजली वाहली. भाजप क्रूरपणे शेतकरी आंदोलन चिरडत असून अजूनपर्यंत संबंधितांना अटक देखील केली नाही आहे. याचा देखील निषेध आम्ही करणार आहोत.’

दरम्यान आज, मंगळवारी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधींची भेट घेतली. संजय राऊत म्हणाले की, ‘लखीमपूर खेरीमध्ये दुःखद घटना झाली आहे. राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत. देशातील अशाप्रकारच्या घटना घटत आहेत. प्रियांका गांधींना अटक केली आहे, अशा परिस्थितीत त्यांना भेटणे गरजेचे आहे. जर कायदा सर्वांसाठी समान आहे, तर प्रियांका गांधी जेलमध्ये का आहेत? जर हिच घटना दुसऱ्या राज्यात घडली असती तर आतापर्यंत भाजपच्या लोकांनी खळबळ माजवली असती. जर कोणी शेतकऱ्यांच्या दुःखात सामील होऊ इच्छित आहेत, तर सरकार त्यांना का थांबवत आहे? लोकशाहीत प्रत्येकाला हा अधिकार आहे. जर कोणी शेतकऱ्यांसाठी आवाज उठवले तर त्याला का रोखले जात आहे?’


हेही वाचा – Cruise drug bust: मनीष भानुशालीचे गुजरात ड्रग्ज कनेक्शन काय?