घरदेश-विदेशप्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने वेधले सर्वांचे लक्ष

प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने वेधले सर्वांचे लक्ष

Subscribe

नवी दिल्ली : भारताच्या ७४व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त कर्तव्यपथावर आज, गुरुवारी संचलन झाले. यावेळी विविध राज्यांच्या झालेल्या चित्ररथांच्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाने सर्वांचे लक्ष वेधले. ‘महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठे आणि स्त्रीशक्ती जागर’ या संकल्पनेवर आधारित हा चित्ररथ होता.

राजधानी दिल्लीच्या कर्तव्यपथावर झालेल्या संचलनात २३ चित्ररथांचे संचलन झाले. यामध्ये १७ राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेश आणि सहा विविध मंत्रालये व विभागांच्या माध्यमातून देशाच्या भौगोलिक आणि समृद्ध सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडविण्यात आले.

- Advertisement -

महाराष्ट्राबरोबरच आसाम, अरुणाचल प्रदेश, त्रिपुरा, पश्चिम बंगाल, जम्मू आणि काश्मीर, लडाख, दादर नगर हवेली आणि दमण आणि दीव, गुजरात, हरियाणा, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि केरळ या राज्यांचे चित्ररथ होते.

- Advertisement -

सांस्कृतिक, गृह, गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार (केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग), आदिवासी व्यवहार तसेच कृषी आणि शेतकरी कल्याण (इंडियन कौन्सिल अॅग्रीकल्चर रिसर्च अर्थात भारतीय कृषी संशोधन परिषद) या मंत्रालयांचे आणि विभागांचे चित्ररथही यात सहभागी झाले होते.

यामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने सर्वाधिक लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्राच्या चित्ररथासाठी ‘साडेतीन शक्तिपीठे व स्त्रीशक्ती जागर’ या संकल्पनेची निवड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे प्रसिद्ध आहेत. या साडेतीन शक्तिपीठांमध्ये कोल्हापूरचे महालक्ष्मी मंदिर, तुळजाभवानीचे श्री क्षेत्र तुळजापूर, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तशृंगी देवी या धार्मिक स्थळांचा समावेश आहे. त्यामुळे या देवींच्या भव्य आणि तितक्याच सुंदर प्रतिमांचे आणि त्यांच्या माध्यमातून स्त्री सामर्थ्याचे दर्शन यावेळी सर्व देशवासीयांना या चित्ररथाच्या निमित्ताने झाले.

यावर्षीची संकल्पना, रेखाचित्रे व त्रिमितीय प्रतिकृती तुषार प्रधान आणि रोशन इंगोले या युवक मूर्तिकार आणि कलादिग्दर्शक यांनी तयार केली आहे. त्यांच्यासोबत ‘शुभ एड’चे संचालक नरेश चरडे आणि पंकज इंगळे यांनी भव्य प्रतिकृतीचे काम सांभाळले. ३० जणांचा समावेश असलेल्या, युवक मूर्तिकार आणि कलाकारांच्या टीमला घेऊन राहुल धनसरे मेहनत घेऊन हा चित्ररथ परिपूर्ण केला. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हा चित्ररथ साकारण्यासाठी या मूर्तिकार आणि कलाकारांना संधी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -