पंतप्रधानांचं डोकं कॉम्प्युटरपेक्षाही जलद; राज्यपाल कोश्यारींकडून मोदींचं तोंडभरून कौतुक

राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून राजकीय सत्तासंघर्ष वाढताना दिसतोय. यात महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प राज्याबाहेर जात असल्याने विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपल्याचे दिसतेयय. यातील बहुतांश प्रकल्प मोदी सरकारने राजकीय फायद्यासाठी गुजरातला वळवल्याचा विरोधकांचा दावा आहे. यावरून विरोधक सत्ताधारी शिंदे फडणवीस सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर हल्लाबोल करत आहेत. यात शिवसेना बाळासाहेब ठाकरे गट टीकास्त्र डागण्यात आघाडीवर आहे. तर दुसरीकडे मात्र राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारींकडून पंतप्रधान मोदी यांच्या कामाचे तोंडभरून कौतुक केले जात आहे. (maharshtra governor bhagat singh koshyari praises pm modi for skill development programme)

एका कार्यक्रमात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदींवर स्तुतिसुमनं उधळली आहे. कोश्यारी म्हणाले की, आपण सर्वजण भारतीय आहोत आणि आपण विश्वासावर चालतो. आपण जे काम करतो ते काम किती कौशल्यपूर्ण करतो, त्याला योगा म्हणतात. मला वाटते आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे स्वत: योगी आहेत. ते योगाचा अभ्यास करतात. आपल्या पंतप्रधान मोदींचं डोक्यात एखाद्या कॉम्प्युटरपेक्षा थोड्या जास्त जलदगतीने विचार येतात. असेही भगतसिंह कोश्यारी म्हणाले आहेत…

नरेंद्र मोदींनी पंतप्रधानाची सूत्र हाती घेताच एका वर्षाच्या आत कौशल्य विकास मंत्रालय सुरु केले, ही एक मोठी गोष्ट आहे. इतक्या वर्षात कोणीही विचार केला नाही तो विषय त्यांनी हाती घेतला. कारण आपण सर्वजन विज्ञान, कला आणि वाणिज्य शाखांचे शिक्षण घेतो. परंतु यातून आपण रोजगार कसा मिळवू शकतो, आणि कशाप्रकारे रोजगार देऊ शकतो? यासाठी देशात अधिक प्रमाणात कौशल्य विकासाला चालना मिळेल म्हणून पंतप्रधान मोदींनी प्रयत्न केला, असही भगतसिंह कोश्यारी यांनी नमूद केले.

दरम्यान राज्याबाहेर जात असलेल्या प्रकल्पांवरून शिवसेनेने केंद्रातील मोदी सरकारवर जहरी टीकास्त्र डागले आहे. गुजरातच्या पलीकडे सध्याच्या दिल्लीकरांची झेप जात नाही. महाराष्ट्रावरील घाव हा राष्ट्रावरील घाव आहे. महाराष्ट्राच्या इज्जतीचे अपहरण हे राष्ट्रीय अस्मितेचे वस्त्रहरण आहे. महाराष्ट्र आपल्या पायावर, हिमतीवर उभा आहे आणि राहिलही. पण इतर मागास राज्यांना विकासात सहभागी करून घेतले जात नसेल तर सबका साथ, सबक विकास या मोदी घोषणेतील फोलपण दिसून येतो. रुपयातील 80 पैसे गुजरातला आणि उतरलेले 20 पैसे सारा देशाला असे जर गणित ठरले असेल तर, गुजरातला सोन्यानेच मढवीत का नाही? असा सवालही शिवसेनेने केला आहे.


हेही वाचा : संजय राऊतांच्या अडचणी काही संपेना! ‘या’ दिवशी होणार आता जामिनावर सुनावणी