घरताज्या घडामोडीमहात्मा फुले विज्ञानाचे पुरस्कर्ते; आजही त्यांचे विचार समाजाच्या उभारीसाठी उपयुक्त : शरद...

महात्मा फुले विज्ञानाचे पुरस्कर्ते; आजही त्यांचे विचार समाजाच्या उभारीसाठी उपयुक्त : शरद पवार

Subscribe

महात्मा फुले हे विज्ञानाचे, आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते होते. त्यांचे हे काम पुढे नेण्याचे अतिशय चिकाटीचे आहे, गरजेचे आहे. कारण महात्मा फुले यांचा विचार हा परिवर्तनाचा, विज्ञानाचा पुरस्कार करणारा, समाजातील शेवटच्या माणसाचे हित जोपासणारा व त्यांच्या दु:खांची मांडणी करणारा आहे, तो वाढविला पाहिजे, अधिक वृद्धिंगत करायला हवा.

मुंबई : महात्मा फुले हे विज्ञानाचे, आधुनिक विचारांचे पुरस्कर्ते होते. त्यांचे हे काम पुढे नेण्याचे अतिशय चिकाटीचे आहे, गरजेचे आहे. कारण महात्मा फुले यांचा विचार हा परिवर्तनाचा, विज्ञानाचा पुरस्कार करणारा, समाजातील शेवटच्या माणसाचे हित जोपासणारा व त्यांच्या दु:खांची मांडणी करणारा आहे, तो वाढविला पाहिजे, अधिक वृद्धिंगत करायला हवा. महात्मा फुले यांचे हे विचार आजच्या काळातही समाजाच्या उभारणीसाठी अत्यंत उपयुक्त असून हे विचार देशातील शेवटच्या तरुणाच्या मनात रुजविण्याची आवश्यकता असल्याचे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले. (Mahatma Phule thoughts are useful for building society says Sharad Pawar)

महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्थापन केलेल्या सत्यशोधक समाजाला १५० वर्ष पूर्ण होत आहे. त्यानिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे राज्यातील सत्यशोधक चळवळीत काम करणाऱ्या मान्यवरांचा मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी राज्याचे माजी मंत्री छगन भुजबळ उपस्थित होते.

- Advertisement -

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, कार्याध्यक्ष बापूसाहेब भुजबळ, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष ईश्वर बाळबुधे, महिला प्रदेशाध्यक्षा मंजिरी धाडगे, सदानंद मंडलिक, प्रदेश उपाध्यक्ष दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, प्रदेश चिटणीस समाधान जेजुरकर, शहराध्यक्ष कविता कर्डक, जिल्हाध्यक्ष प्रा.ज्ञानेश्वर दराडे, डॉ. योगेश गोसावी, महिला जिल्हाध्यक्षा पूजा आहेर, शहराध्यक्ष आशा भंदूरे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंध समाजामध्ये अवैज्ञानिक परंपरा, अंधश्रद्धा, स्त्रीदास्य पद्धती, ब्राह्मण्य, अमानवी व माणुसकीला काळिमा फासणारे प्रकार देशात सुरु होते. यावेळी भगवान गौतम बुद्धांनी याला विरोध करून सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले यांनी याच सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यातून त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. जातीभेद आणि अन्याय याची परिसीमा त्याकाळी गाठली गेली होती अशावेळी धार्मिक आणि सामाजिक सुधारणा असा दुहेरी भाव सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून मांडला गेला असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

- Advertisement -

महात्मा फुले यांनी गुलामगिरी, अस्पृश्यता, स्त्री दास्य, जनावरांच्या हत्या याला विरोध केला. व्यसनापासून दूर रहावे अशी शिकवण त्यांनी सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून दिली. सत्यशोधक समाजाचा केवळ आणि सामाजिक सुधारणा हा हेतू नव्हता तर लोकप्रबोधन, शिक्षण सुधारणा, शेतकरी हित, सावकारी उच्चाटन यासह अनेक प्रश्नांवर काम केले असल्याचे सांगत महात्मा फुले यांनी मांडलेला शेती विज्ञानवादी विचार हा अतिशय महत्वाचा असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

महात्मा फुले यांचे हे विचार पुढे छत्रपती शाहू महाराज, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यासह अनेक समाजसुधारकांनी रुजवले. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची समाधी शोधून त्याचा जीर्णोद्धार केला. तसेच त्यांच्यावर पोवाडा तयार करून सत्य जगासमोर मांडले असेही शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

देशात अद्यापही अंधश्रद्धा दूर झालेली नाही. ही अंधश्रद्धा दूर करण्यासाठी काही प्रामाणिक प्रयत्न देखील सुरु आहे. मात्र अनेक लोक देशांमध्ये अंधश्रद्धा वाढीला लागली पाहिजे म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी धर्माधर्मात जातीजातीत भांडणे लावण्याच्या प्रयत्नात आहेत. अन्याय अत्याचार होत आहे. हे सर्व थांबविण्यासाठी सत्यशोधक समाजाचे महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.आंबेडकरांचे विचार प्रेरक असून हेच विचार देशाला या यादवीतून वाचवू शकतात असे प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

देशात महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालणारा एकमेव नेता आहे, ते म्हणजे खासदार शरद पवार. महात्मा फुले यांनी जी आरक्षणाची संकल्पना मांडली त्यावर पवारसाहेबांनी प्रत्यक्ष काम केले. त्यांनी मंडल आयोगाची राज्यात अंमलबजावणी करून ओबीसींना शिक्षण, नोकरी आणि राजकरणात आरक्षण देण्याचे काम, देशातील महिलांना राजकारणात ५० टक्के आरक्षण देऊन प्रतिनिधित्व देण्याचे अतिशय महत्वपूर्ण काम त्यांनी केले. मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचे संसदेच्या प्रांगणात महात्मा फुले यांचा पुतळा बसविण्यासाठी काम पवारसाहेब यांच्या प्रयत्नातून झाले असल्याचे छगन भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

देशात आरक्षणाचा प्रश्न गंभीर बनला आहे. आरक्षण हटविण्याचे काम सद्या देशात सुरु आहे. विघातक शक्ती या आरक्षणाला न्यायालयात आव्हान देण्याचे काम करत आहे. हे आरक्षण टिकविण्यासाठी आपला न्यायालयीन लढा सुरू आहे. आपण दिलेले ओबीसींचे आरक्षण टिकविण्याची लढाई आपण जिंकलो आहे. मात्र अद्यापदेखील ही लढाई संपलेली नाही. आपली ही लढाई सुरु राहील. यापुढे आपल्याला जेव्हा जेव्हा गरज पडेल त्यावेळी रस्त्यावर उतरून आपल्याला लढाई लढावी लागेल. यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी सदैव तयार रहायला हवं असे आवाहन छगन भुजबळ यांनी यावेळी केले.


हेही वाचा – ईडी सरकारमुळे ‘ही’ नामुष्की महाराष्ट्रावर आली; राष्ट्रवादीची टीका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -