‘मनुवाद संपवण्यासाठी फुले दाम्पत्याचे विचार महत्त्वाचे’

क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे शरद पवार यांना समता पुरस्कार देण्यात आला.

sharad-pawar
शरद पवार यांना पुरस्कार प्रदान

मनुवाद संपविण्यासाठी महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले विचार पुढे आणले पाहिजेत. देशात प्रतिगामी विचार रूजविण्याचा प्रयत्न होत आहे, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले. ‘महात्मा फुले यांनी समाजाला आधुनिकतेचा विचार दिला. आज मात्र प्रतिगामी विचार पुढं आणला जातोय. मनुवादाचा विचार अजून संपलेला नाही. क्रांतीसूर्य महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे आज, २८ नोव्हेंबर रोजी शरद पवार यांना समता पुरस्कार देण्यात आला. महात्मा फुले वाडा येथे हा कार्यक्रम पार पडला असून माज राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते हा पुरस्कार पवार यांना देण्यात आला. एक लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह, फुले पगडी आणि उपरणे असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.

वाचा : शरद पवार – राज ठाकरेंच्या ‘विमान भेटी’त काय बोलणं झालं?

जबाबदारीच्या विचारांना पुढे नेणारी व्यक्ती

या कार्यक्रमाला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, श्रीनिवास पाटील, छगन भुजबळ, देवीसिंग शेखावत आदी मान्यवर उपस्थित होते. सार्वजनिक जीवनात असताना मला अनेक पुरस्कार मिळाले, पण मला मिळालेला हा पुरस्कार विचारांचा समतेचा आहे. त्यामुळे हाच खरा सन्मान आहे. देशात सध्या प्रतिगामी विचार रुजविण्याचा प्रयत्न होत आहे, असे शरद पवार यावेळी म्हणाले. महात्मा फुलेंच्या कामात विचार, धडपड होती. महिलांच्या सन्मानासाठी फुलेंनी प्रचंड प्रयत्न केले, आपले संविधानाचे रक्षण करण्याची सर्वांची जबाबदारी आहे. अशा जबाबदारीच्या विचारांना पुढे नेणारी व्यक्ती म्हणजे शरद पवार. पवार यांनी सर्वच क्षेत्रात भरीव काम केले आहे, असे प्रतिभाताई पाटील म्हणाल्या.

वाचा : राम मंदिराच्या मुद्यावरून शरद पवारांची सरकारवर टिका

भुजबळ मराठा आरक्षणावर बोलले 

तर छगन भुजबळ यांनी यावेळी मराठा आरक्षणाबाबत आपले मत मांडले. ते म्हणाले की, इतर घटकांच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण द्यावे. इतरांसारखीच भूमिका मी मांडतो, पण माझ्याविरोधात राजकीय वातावरण तापवण्याचा प्रयत्न होतो आहे. फुले वाडा हे उर्जा शक्ती आहे. पाठपुरावा करूनही राष्ट्रीय स्मारक होत नाही. हो म्हणतात पण काहीच करीत नाहीत. या कामासाठी आम्ही कोट्यवधी रूपये मागत नाही. काही प्रमाणात निधी देऊन स्मारक केले पाहिजे. हे काम लवकर होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.