घरताज्या घडामोडीमहाविकास आघाडीचं ठरलं, विधानसभा अध्यक्षपदासाठी ६ जुलैला निवडणूक

महाविकास आघाडीचं ठरलं, विधानसभा अध्यक्षपदासाठी ६ जुलैला निवडणूक

Subscribe

नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गेल्या चार महिन्यापासून विधानसभा अध्यक्षपद रिक्त

काँग्रेसच्या वाढत्या दबावामुळे विधानसभेच्या अध्यक्षपदासाठी विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटी म्हणजे ६ जुलैला निवडणूक होण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना तसे संकेत दिले. विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी महाविकास आघाडीत हालचाली सुरू झाल्या असताना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्य सरकारला निवडणूक घेण्याबाबत पत्र दिल्याने राजकारण तापले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावर राज्यपालांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक घेण्यास सांगितले आहे.

नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर गेल्या चार महिन्यापासून विधानसभा अध्यक्षपद रिक्त आहे. हे पद काँग्रेसच्या वाट्याला असल्याने हे पद ५ जुलैपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनातच भरण्यात यावे, असा काँग्रेसचा आग्रह आहे. त्यावर मंगळवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात चर्चाही झाली. राष्ट्रवादीच्या मंत्र्यांच्या कालच्या बैठकीतही यावर खल झाला.

- Advertisement -

मात्र, राज्यपालांनी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप शिष्टमंडळाची मागणी पुढे करत विधानसभा अध्यक्षपद तातडीने भरण्याची सूचना केली आहे. त्यासोबतच अधिवेशनाचा कालावधी वाढविणे आणि ओबीसीना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेले अतिरिक्त आरक्षण रद्द झाल्याने पोटनिवडणुका रद्द करण्याबाबत राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडे विचारणा केली आहे.

या पत्राचे पडसाद महाविकास आघाडीत उमटले आहेत. विधानसभा अध्यक्षपद हे काँग्रेसकडे असून या पदासाठी पावसाळी अधिवेशनात ६ जुलैला निवडणूक घेण्यात येणार असल्याचे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. आघाडीतील तीनही पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे काँग्रेस उमेदवार निवडून येईल, असा विश्वास थोरात यांनी व्यक्त केला. तर राज्यपालांनी भाजपाच्या मागणीवरून विधानसभा अध्यक्षाच्या निवडीबाबत आदेश देऊ नयेत आणि त्यांनी भाजपच्या सांगण्यावरून कामकाज करु नये, असा टोला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लगावला आहे. येणाऱ्या अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड व्हावी असा आमचा आग्रह असून त्यावर निर्णय होईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

आमची रणनीती तयार : शेलार

महाविकास आघाडी सरकार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक जाहीर न करताच निवडणुकीचे वातावरण तयार करीत आहे. हिंमत असेल तर महाविकास आघाडीने निवडणूक जाहीर करावी. या निवडणुकीसाठी आमची रणनीती ठरली आहे, असे भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी सांगितले.

थोपटे यांचे नाव आघाडीवर

दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेसमध्ये पुणे जिल्ह्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे आणि परभणीतील सुरेश वरपूडकर यांचे नाव चर्चेत आहे. आघाडीत काँग्रेसकडून पुणे जिल्ह्यला प्रतिनिधित्व नसल्याने थोपटे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -