सोमवारच्या महाराष्ट्र बंदची सरकारकडून जोरदार तयारी

maharashtra will remain closed on october 11 against the incident of lakhimpur kheri violence

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीमध्ये आंदोलक शेतकर्‍यांवरील अत्याचाराचा निषेध म्हणून राज्यात बंदची जोरदार तयारी महाविकास आघाडीतील तिन्ही घटक पक्षांनी केली आहे. सोमवारच्या बंदला जनतेचा पाठिंबा मिळावा, यासाठी तिन्ही पक्ष एकत्रित प्रयत्न करतील. या बंदमधून अत्यावश्यक सेवेला वगळण्यात येणार असल्याचे महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जाहीर करण्यात आले.

शेतकर्‍यांच्या शांततापूर्वक आंदोलनातील निदर्शक उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्याला काळे झेंडे दाखवून आंदोलन करत असताना केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने शेतकर्‍यांच्या अंगावर गाडी घालून मोठा नरसंहार केला होता. याला जबाबदार असलेल्यांविरोधात कोणतीही कारवाई झाली नाही वा मंत्र्यांचाही राजीनामा घेतला नाही. या घटनेचे पडसाद देशभर उमटले. मात्र, तरीही कारवाई झाली नाही. या घटनेचा निषेध देशभरातील विरोधी पक्षांच्या सरकारांनी केला. शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत बोलताना या बंदमध्ये शिवसेना पूर्ण ताकदीने उतरेल, असे स्पष्ट केले. या देशाच्या संविधानाची हत्या, कायद्याची पायमल्ली आणि अन्नदाता शेतकर्‍याप्रती असलेली बेफिकिरी याचा करावा तितका निषेध कमीच आहे, असे राऊत म्हणाले.

शेतकर्‍यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष करणे, शेतकर्‍यांचे शेकडो बळी जाऊनही त्याची दखल न घेणे आणि आता शेतकर्‍यांना दिवसाढवळ्या गाडी अंगावर घालून मारणे या गोष्टी लोकशाहीसाठी अत्यंत मारक असल्याचे सांगत राऊत यांनी याविरोधात आता देशातल्या जनतेला जागे करण्याची वेळ आली आहे. याकरताच महाराष्ट्रात बंद पुकारण्याचा निर्णय घ्यावा लागल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी स्वत:च महाराष्ट्र बंदमध्ये सर्व राजकीय पक्षांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले. राज्यात बंद पुकारण्याच्या महाविकास आघाडीच्या निर्णयाबाबत काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली असून त्यांनी देखील महाराष्ट्रासह देशात ज्या ज्या राज्यात विरोधी पक्षांचे सरकार आहे, तिकडे बंद पुकारण्यात यावा असे आवाहन करण्यात आले असल्याचे राऊत यांनी सांगितले आहे.

सरकारला जागे न केल्यास अशा निर्घृण कृतीला आळा बसणार नाही. अन्नदाता शेतकरी एकाकी नाही हे दाखवण्याची वेळ आहे. म्हणून सांगू इच्छितो की, काँग्रेस राष्ट्रवादीसह शिवसेना पूर्ण ताकदीने या बंदमध्ये सहभागी असतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक आणि काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी जाहीर केले. मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी बंदबाबत भूमिका जाहीर केल्यामुळे लोक स्वयंस्फूर्तीने बंद पाळतील असे तिन्ही प्रवक्त्यांनी सांगितले.

अत्यावश्यक सेवा सुरू – मलिक
महाराष्ट्र बंद शनिवारी रात्री १२ वाजल्यापासून सुरू होईल. महाराष्ट्र बंद ठेवण्यासाठी तिन्ही पक्षातील कार्यकर्ते लोकांना हात जोडून विनंती करतील. ठिकठिकाणी सर्व कार्यकर्ते लोकांना जाऊन सांगतील की सरकारविरोधात शेतकर्‍यांच्या आपण पाठीशी आहोत. बंदमध्ये अत्यावश्यक सेवेला बाधा येणार नाही. शिवसेना बंदमध्ये सामील होते तेव्हा निश्चितपणे बंद यशस्वी होईल आणि देशाला चांगला संदेश जाईल, असे नवाब मलिक म्हणाले. अत्यावश्यक सेवेत मेडिकल स्टोर, रुग्णवाहिका, हॉस्पिटल, दूध वाहतूक अशा अनेक सेवांना कुठल्याही प्रकारे बाधा येणार नाही, असे मलिक यांनी स्पष्ट केले.

देशात हुकूमशाही – सचिन सावंत
शेतकर्‍यांना वाहनाखाली चिरडणार्‍या आरोपीला वाचवण्याचा उघड प्रयत्न होतो आहे. हा प्रकार भारतीय लोकशाहीला कलंकीत करणारा आहे. भारत हा कृषीप्रधान देश आहे. देशपातळीवर ज्या पद्धतीने प्रियांका गांधी, राहुल गांधींना आडवण्यात आले, हा सारा प्रकार देशात हुकूमशाही आल्याचे द्योतक आहे. कामगारांवर अत्याचार होत आहे. देशातील संविधानिक संस्था मोडीस काढण्यात येत आहेत. विरोधकांवर दमनशाही अवलंबली जात आहे. यंत्रणांचा गैरवापर करत आहेत असे काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले.