मुंबई – लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यानंतर आता राजकीय पक्षांना वेध लागले आहेत स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचे. महायुतीला विधानसभेत मिळालेल्या अभुतपूर्व यशामुळे त्यांनी युतीमध्येच पुढील निवडणूक लढवण्याचे निश्चित केले आहे. मात्र महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांना पराभवाचा मोठा धक्का बसला आहे. या पराभवाचे खापर कोणावर फोडण्यापेक्षा त्यांनी आगामी निवडणुका स्वतंत्रपण, स्वबळावर लढवण्याची भाषा सुरु केली आहे. यामध्ये ठाकरेंची शिवसेना आघाडीवर आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि राज्यसभा सदस्य संजय राऊत यांनी शिवसेनेने (ठाकरे) मुंबईसह 14 महापालिकांच्या निवडणुकीची तयारी सुरु केली असून पूर्ण ताकदीने या निवडणुका लढवू असा निर्धार केला आहे. संजय राऊत यांची भाषा ही स्वबळावर निवडणूक लढवण्याची होती. तर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे की, राऊतांची बॉडी लँग्वेज ही पराभूत मानसिकतेची दिसत होती. त्यांना स्वबळावर लढायचे असेल तर आमचीही तयारी आहे.
मुंबईसह राज्यातील 14 महानगरपालिकांच्या निवडणुका येत्या मार्च-एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. शिवसेना शिंदे गटाने काल येथे बैठक घेऊन निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. महायुतीमध्ये निवडणूक लढवली जाईल असे उपमुख्यमंत्री शिंदेंनी म्हटले आहे. महाविकास आघाडीमध्ये मात्र एकवाक्यता दिसत नाही.
संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
खासदार संजय राऊत म्हणाले, निवडणुका कधीही लागू द्या. शिवसेनेने (ठाकरे) मुंबईसह 14 महानगरपालिकांच्या निवडणुकीची तयारी केली आहे. आम्ही अत्यंत ताकदीने निवडणुका लढवू. तीन वर्षांपासून हरण्याच्या भीतीने निवडणुका रखडवून ठेवल्या आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था कधीही युतीत लढल्या गेल्या नाही
संजय राऊत यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधीही युती किंवा आघाडीत लढल्या गेल्या नाहीत. भाजप – शिवसेना युती असतानाही आणि काँग्रेस – राष्ट्रवादीची आघाडी असतानाही या निवडणुका एकत्र लढल्या गेल्या नाही. या वेगळ्या प्रकारच्या निवडणुका असतात.
ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर पालिका, महानगरपालिका या निवडणुका वेगवेगळ्या असतात. ज्यांना स्वतंत्रपणे लढायचे आहे त्यांनी लढले पाहिजे. या निवडणुकातून कार्यकर्त्यांना बळ दिले पाहिजे, हेच बळ विधानसभा आणि लोकसभेला आघाडी, युतीला उपयोगात येते.
संजय राऊत यांनी एक प्रकारे शिवसेनेचे (ठाकरे) पत्ते उघड केले. राऊतांच्या या भूमिकेवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, राऊतांची बॉडी लँग्वेज पराभुताची वाटत होती. या निराशेपोटी त्यांनी एकला चलोचा नारा दिला असेल. त्यांचा पक्ष स्वतंत्र आहे, विचारधारा स्वतंत्र आहे, तो त्यांचा अधिकार आहे.” महाविकास आघाडीत विधानसभेच्या पराभवानंतर वेगवेगळे लढण्याचा विचार वाढत असल्याचे यावरुन दिसत आहे. शिवसेना हिंदूत्वापासून दूर गेली असाही आरोप त्यांच्यावर होत आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्यापासून वेगळे होऊन ते लढण्याची तयारी करत असल्याचे संकेत दिले आहेत.
निवडणुका जाहीर केव्हा होतात आणि त्यानंतर महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष काय करतात याकडे आता सर्वांचे लक्ष आहे.
हेही वाचा : Sanjay Jadhav : दंगल झाली तेव्हा ‘सेफ है’ म्हणणारे कुठे गेले होते? ठाकरे गटाच्या खासदारांचा सवाल
Edited by – Unmesh Khandale