भाजप सरकारनं लावलेल्या झाडांची मुळं महाविकासआघाडी सरकार उखडणार!

भाजप सरकारने त्यांच्या काळात लागवड केलेल्या ३३ कोटी वृक्षांच्या योजनेची चौकशी करण्याचा निर्णय वनमंत्री संजय राठोड यांनी घेतला आहे.

sudhir mungantiwar tree plantation

महाविकासआघाडीचं सरकार राज्यात सत्तेत आल्यानंतर लगेचच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आधीच्या भाजप सरकारने सुरु केलेल्या अनेक विकासकामांना स्थगिती दिली. त्यामुळे भाजपच्या काळात सुरू झालेल्या अनेक योजना थांबल्या असतानाच आता मागच्या सरकारने केलेल्या वृक्षलागवडीच्या योजनेची पाळमुळं खणून काढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप सरकारने राज्यभरात तब्बल ३३ कोटी वृक्षलागवड केल्याचा दावा केला होता. त्यासाठी वर्षाला किमान हजार कोटी रुपये खर्च देखील केला होता. त्याच योजनेची चौकशी करण्याचा निर्णय महाविकासआघाडी सरकारने जाहीर केला आहे. विद्यमान वनमंत्री संजय राठोड यांनी या योजनेच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

सयाजी शिंदे यांचाही बसला नव्हता विश्वास!

पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी अशा या प्रकल्पामध्ये माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते या योजनेचं उद्घाटन झालं होत. यामध्ये पाच वर्षांत सुमारे १०० कोटी वक्षलागवडीचा मानस भाजप सरकरने व्यक्त केला होता. त्यात ३३ कोटी वृक्ष लागवड झाल्याचा दावा देखील करण्यात आला होता. मात्र, या दाव्यावर अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत होतं. त्यामध्ये वृक्षसंवर्धनासाठी जनजागृती करणारे अभिनेते सयाजी शिंदे यांचा देखील समावेश होता. त्याच पार्श्वभूमीवर आता या वृक्षलागवडीच्या दाव्याची चौकशी केली जाणार आहे.

मुनगंटीवारांनी केलं चौकशीचं स्वागत!

या अभियानादरम्यान नक्की किती वृक्ष लावले गेले, त्यातले किती जगले, कोणते वृक्ष लावले गेले या सगळ्या मुद्द्यांवर चौकशी केली जाणार आहे. मात्र, सरकारने चौकशीचे आदेश दिले असले, तरी माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या आदेशांचं स्वागत केलं आहे. ‘आमच्या या अभियानाची दखल लिम्का बुकनं देखील घेतली आहे. त्यामुळे चौकशी करायची असेल, तर सरकारने खुशाल करावी आणि वाटलंच तर श्वेतपत्रिका देखील काढावी’, असं मुनगंटीवार म्हणाले आहेत.