मुंबई : महाराष्ट्र विधानसभेसाठी बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदान झाले असून दोन दिवसांनी निकाल लागणार आहे. निवडणूक आयोगाने बुधावारी रात्री साडेअकरा वाजता दिलेल्या आकडेवारीनुसार सुमारे 65.02 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. राज्यात झालेल्या एकूणच मदानानंतर कोणत्याही एका पक्षाला सहज एकहातील सत्ता मिळेल अशी सध्या तरी परिस्थिती नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेचा 145 चा जादुई आकडा गाठण्यासाठी अपक्षांची मदत लागणार आहे. याचपार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. महाविकास आघाडीची आज मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये बैठक पार पडत आहे. (Mahavikas Aghadi to meet at Grand Hyatt today to win over independent candidates)
दोन दिवसांनी विधानसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र निकालानंतर कुठलाही धोका होऊ नये यादृष्टीने महाविकास आघाडीकडून रणनीती आखण्यास सुरुवात झाली आहे. एका आलिशान हॉटेलमध्ये सुरू असलेल्या बैठकीला महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते हजर आहेत. या बैठकीत सर्व पर्यायांची चाचपणी करण्याकडे महाविकास आघाडीचा कल आहे. त्यात प्रामुख्याने इतर पक्ष, अपक्ष आणि बंडखोर यांच्याशी संपर्क साधण्याची चर्चा सुरू झाली आहे. विधानसभेचा एकदा निकाल लागला आणि अपक्षांची सरकार बनविण्यासाठी महत्त्वाची भूमिका असेल नसे निश्चित झाले की साहजिकच अपक्षांचा भाव वधारणार आहे. अशावेळी त्यांची मर्जी वळविण्यासाठी तारेवरची कसरत करण्यापेक्षा कोणते अपक्ष आमदार निश्चित निवडून येतील याचा अंदाज बांधत बुधवारपासूनच राजकीय पक्षांचे लोक या अपक्षांना आपल्याकडे वळविण्याच्या कामात व्यस्त झाल्याचे समजते.
हेही वाचा – Nana Patole : मुंबईला लुटणाऱ्या गौतम अदानींना हिशोब चुकता करावा लागेल; पटोलेंचा इशारा
काही राजकीय पक्षांनी तर मतदानाच्या आधीपासूनच याबाबतचा अंदाज बांधत काही जणांना रसद पुरवल्याचे समजते. सोलापूर दक्षिणमध्ये धर्मराज काडाबी, अक्कलकुवामध्ये हिना गावित, रामटेक मध्ये राजेंद्र मुळक, बडनेरामध्ये प्रिती बंड, सांगलीमध्ये जयश्री पाटील, इंदापूरमध्ये प्रविण माने, नांदगावमध्ये समीर भुजबळ अशा अनेक अपक्ष उमेवारांच्या संपर्कात राजकीय पक्ष असल्याचे समजते. कारण यावेळेला राज्यात जवळपास 20 ते 22 अपक्ष आमदार निवडून येतील असा विविध राजकीय पक्षांचा आधीपासूनच व्होरा आहे. साहजिकच सत्तास्थापनेमध्ये यांचा मोठा वाटा असू शकतो हे गृहीत धरून आधीपासूनच अपक्षांना संपर्क साधण्याचा राजकीय पक्षांनी सुरूवात केली आहे. गुरूवारी काही अपक्षांना मुंबईमध्ये बोलाविण्यात आल्याचेही समजते.
देवेंद्र फडणवीसांनीही घेतली मोहन भागवतांची भेट
दरम्यान, राज्यात बुधवारी मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर गृहमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी आरएसएस प्रमुख डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी मोहन भागवत आणि माजी सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्याशी सुमारे 20 मिनिटे चर्चा केली. या भेटीत नेमकी काय चर्चा झाली? याची कुठलीही अधिकृत माहिती संघाकडून किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात आलेली नाही.
हेही वाचा – Maharashtra Election 2024 : रेकॉर्डब्रेक मतदानामुळे 15 मतदारसंघांतील प्रस्थापित नेते चिंतेत!