घरमहाराष्ट्रआघाडी पुण्यातील दोन्ही पोटनिवडणूक लढविणार

आघाडी पुण्यातील दोन्ही पोटनिवडणूक लढविणार

Subscribe

चिंचवडसाठी शिवसेना आग्रही, काँग्रेसला कसबा पेठचा प्रस्ताव

येत्या २६ फेब्रुवारी रोजी होऊ घातलेली कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे आवाहन भाजपकडून होत असताना महाविकास आघाडीने या दोन्ही जागा लढविण्याची तयारी केली आहे. शिवसेनेने चिंचवडचा आग्रह धरला असून काँग्रेस-राष्ट्रवादीसमोर कसबा पेठचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.

नोव्हेंबर महिन्यात पार पडलेल्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भाजपने उमेदवार मागे घेऊन शिवसेना (उद्धव ठाकरे गट) उमेदवार ऋतुजा लटके यांचा विजयाचा मार्ग सुकर केला होता. त्यामुळे भाजपने कसबा पेठ आणि चिंचवडची पोटनिवडणूक बिनविरोध करावी, असे आवाहन महाविकास आघाडीला केले आहे. मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप हे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या चिन्हावर निवडून गेले होते. त्यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होत असल्याने भाजप या दोन्ही जागा लढविणार आहे.

- Advertisement -

या पोटनिवडणुकीबाबत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि जयंत पाटील आदींनी मंगळवारी रात्री मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत राष्ट्रवादीने दोन्ही मतदारसंघांत आमची संघटनात्मक ताकद जास्त असल्याने या जागा राष्ट्रवादीला मिळाव्यात, अशी मागणी केली, मात्र ठाकरे यांनी चिंचवडची जागा राहुल कलाटे यांच्यासाठी शिवसेनेला सोडावी, असा आग्रह धरल्याचे समजते.

या पार्श्वभूमीवर बुधवारी शिवसेना भवनात ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, महाविकास आघाडी म्हणून पुण्यातील दोन्ही जागा लढण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे, मात्र महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी असे तीन पक्ष आहेत. सर्वांची आपापली एक भूमिका आहे. आम्ही संघटना वाढीसाठी दावे करत असतो. अजित पवारांनीही आपले म्हणणे मांडले आहे, पण चिंचवडची जागा शिवसेनेला मिळावी, अशी मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने कसबा पेठची जागा लढवावी, असा प्रस्ताव ठेवण्यात आल्याचे राऊत यांनी सांगितले.

- Advertisement -

चिंचवडची जागा शिवसेनेने लढवावी, अशी पिंपरी-चिंचवड शहरातील शिवसैनिकांची मागणी आहे. २०१९ मध्ये अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी दिवंगत लक्ष्मण जगताप यांना निकराची लढत दिली होती. त्या निवडणुकीत कलाटे यांचा थोडक्यात पराभव झाला असला तरी यंदा ही जागा आम्ही जिंकू, असा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला.

पोटनिवडणूक बिनविरोध करावी ः मुख्यमंत्री शिंदे
दरम्यान, एखाद्या सदस्याचे निधन झाल्यास होणारी पोटनिवडणूक बिनविरोध करण्याची आपली, महाराष्ट्राची परंपरा आहे. मुंबईत भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाने मुंबईतील पोटनिवडणुकीतून माघार घेतली होती. त्यामुळे ही परंपरा सगळ्यांनी कायम ठेवावी आणि जपावी, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे, तर महाराष्ट्राची संस्कृती काय आहे आणि त्याची सध्या कशी पायमल्ली होत आहे हे कुणी सांगायचे. पंढरपूर आणि नांदेडच्या पोटनिवडणुकीत ही संस्कृती कुठे दिसली नाही, मात्र अंधेरीत दिसली त्याला वेगळी कारणे होती, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.

शिवसेनेचा आग्रह आहे की चिंचवडची पोटनिवडणूक आम्ही लढावी. चिंचवडमधील मतदारांचाही तो हट्ट आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि सुनील तटकरे यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. त्यावेळीही आम्ही आमची यासंदर्भातील भूमिका मांडली.
-संजय राऊत, खासदार, ठाकरे गट

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -