नवी मुंबईत महाविकास आघाडी पालिका निवडणूक एकत्र लढणार

राज्यातील इतर महानगरपालिका (BMC) बरोबरच नवी मुंबई महानगरपालिकेच्या (NMMC) निवडणुकीची आरक्षण सोडत ३१ मेपर्यत निवडणुक आयोगाच्या आदेशानुसार जाहिर करण्यात येणार आहे. त्यामुळे पालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून नवी मुंबईत आतापासून राजकीय नेत्यांचा सारीपाठ सुरु झाला आहे. राज्यात सत्तेवर असणार्‍या महाविकास आघाडीमध्ये कोणत्याही प्रकारची फुट पडू नये यासाठी महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) प्रमुख नेत्यांची बैठक आज मंगळवारी सानपाडा येथील एका खाजगी हॉटेलमध्ये (Hotel) बैठक पार पडली. या बैठकीत पालिकेत सत्तेवर असणार्‍या भाजपाला टक्कर देण्यासाठी एकत्रित लढण्याचा निर्णय स्थानिक पातळीवर घेण्यात आला. या बैठकीनंतर पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांची सर्वपक्षीय प्रमुख नेत्यांनी भेट घेत पारदर्शकपणे निवडणुका पार पाडाव्यात यावर चर्चा केली.

सर्वेच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ३१ मेपर्यंत आरक्षण सोडत होणार असल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. त्यामुळे महाविकास आघाडीने एकत्र येण्याचे ठरवले आहे. महाविकास आघाडीमधील राजकीय नेते एकमेकांच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करत असल्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होण्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती.परंतु निवडणुकीसाठी यंत्रणा कामाला लागलेली असताना महाविकास आघाडीच्या नेत्यांनी एकत्रितपणे दर्शन देत. महाविकास भाजपा व माजी मंत्री गणेश नाईक यांची महापालिकेवरील एकहाती सत्तेला सुरुंग लावण्यासाठी मैदानात उतरल्याचे दाखवून दिले आहे.

या बैठकीला महाविकास आघाडीचे प्रमुख शिवसेना उपनेते विजय नाहटा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार शशिकांत शिंदे,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सचिव नामदेव भगत, प्रशांत पाटील,काँग्रेस प्रदेश सचिव संतोष शेट्टी,शिवसेनेचे माजी विरोधी पक्ष नेते विजय चौगुले,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विठ्ठल मोरे, राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष अशोक गावडे , काँग्रेस पक्षाचे जिल्हा अध्यक्ष अनिल कौशिक,शिवसेनेचे शहर प्रमुख विजय माने इत्यादी नेते उपस्थित होते.

हेही वाचा : खासदार संजय राऊतांचा २८ मे रोजी कोल्हापूर दौरा, जाहीर सभा घेणार

यावेळी बैठकीत निवडणूक रणनीती ठरविण्यात आली तसेच प्रभाग रचनेवर चर्चा करण्यात आली.विविध भागात मेळावे घेणे, प्रशिक्षण शिबिरे आयोजित करणे,निवडणुकी बद्दल कार्यकर्त्यांत जागृती निर्माण करणे आशा विविध विषयांवर सकारात्मक आणि खेळीमेळीच्या वातावरणात चर्चा करण्यात आली.

महाविकास आघाडीच्या बैठकीत तिन्ही पक्षाचे नेते उपस्थित होते. यात महाविकास आघाडीच्या माध्यामातून निवडणुक लढवण्याचे ठरवले आहे. याचा प्रस्ताव पक्ष श्रेष्ठीकडे पाठवण्यात येणार आहे.
-अशोक गावडे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष

नवी मुंबईत स्थानिक पातळीवरील असणारे समज गैरसमज दुर करण्यात आले आहे. वरिष्ठांकडे स्थानिक पातळीवर एकत्र लढण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येणार असून त्यावर वरिष्ठ निर्णय घेतील. तर आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत निवडणुकांसदर्भात माहिती घेण्यात आली.
-विठ्ठल मोरे, शिवसेना नेते

राज्या प्रमाणे नवी मुंबई महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. त्याबाबत स्थानिक पातळीवर एकमत झाले आहे. आयुक्तांकडे झालेल्या बैठकीत नवी मुंबईतील नागरी कामे तसेच रखडलेली कामे याबद्दल चर्चा झाली.
-अनिल कौशिक,काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष.