राज्यसभा निवडणुकीतील अनुभव पाहता महाविकास आघाडी योग्य निर्णय घेईल – चंद्रकांत पाटील

Mahavikas Aghadi will take the right decision considering the experience in Rajya Sabha elections, said Chandrakant Patil

विधानपरिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद आला तर प्रयत्न करू, राज्यसभा निवडणुकीतील अनुभव पाहता महाविकास आघाडी योग्य निर्णय घेईल, अशी प्रतिक्रिया भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. ते कोल्हापुरात बोलत होते. चंद्रकांत पाटलांकडून महाविकास आघाडीला देण्यात आलेला हा दुसरा चर्चेचा प्रस्ताव असून त्यामुळे महाविकास आघाडी काय भूमिका घेणार याची उत्सुकता आहे.

तपास करणाऱ्या यंत्राणांवर दबाव –

माझा आणि देवेंद्र फडणवीस यांचा फोन कायम सुरू असल्याचे चंद्रकांत पाटील म्हणाले. माणसाने कोणत्याही गोष्टीचे टेन्शन न घेता काम करत राहिले पाहिजे, असे ते म्हणाले. यावेळी तपास यंत्रणांवर होत असलेल्या आरोपवर त्यांनी यावेळी भाष्य केले. गेल्या काही दिवसांमध्ये तपास करणाऱ्या यंत्राणांवर दबाव आणायचे काम सुरू झाले आहे. कारवाई केली तर घेराव घालणार का तुम्ही? हे चुकीचे असल्याचे ते म्हणाले.

शरद पवार यांना टोला –

तीन वर्षांपूर्वी एका नेत्याला ईडीची नोटीस आली त्यावेळी हजारोच्या संख्येने आंदोलन केले. कशाला ईडी पाहिजे मीच स्वत: ईडीकडे जातो म्हणत हजारो गानरिक गोळा केले. या सगळ्याचा ईडीवर काही परिणाम होणार नाही, असे सांगत चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला.यावेळी तुम्ही काय पेरता हे लक्षात आले पाहिजे असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.