महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. शनिवारी ( 13 डिसेंबर ) महायुती सरकारमधील मंत्र्यांचा शपथविधी मुंबईत राजभवनात होणार असल्याचं बोललं जात होते. त्यासाठी राजवभनात लगबग सुरू झाली होती. पण, अचानक मंत्र्यांच्या शपथविधीचं ठिकाण आणि तारीख बदलली आहे. मुंबईऐवजी नागपुरात नव्या मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीनं याबद्दल वृत्त दिलं आहे.
सोमवारी 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे शनिवारी आणि रविवारी सगळे आमदार नागपुरात दाखल होतील. आमदारांची सोय व्हावी म्हणून शनिवारऐवजी रविवारी ( 15 डिसेंबर ) नागपुरात मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची माहिती आहे.
हेही वाचा : ठाकरेंनी ‘PM’ मोदींवर टीका केल्यानं नवनीत राणांनी काढली लायकी; म्हणाल्या, “जनाब…”
16 तारखेपासून हिवाळी अधिवेशन सुरू होणार असून 15 तारखेला शपथविधी पार पडू शकतो. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विजयी रैली सकाळी 11 वाजता निघणार आहे. ही रैली साधारण 3 तास चालण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हे सगळे बघता रविवारी दुपारी 4 वाजता नागपूर राजभवन येथे शपथविधी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महत्त्वाचे म्हणजे “16 डिसेंबरपूर्वी आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करू,” असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होते. याशिवाय मुंबईतील राजभवनऐवजी आता नागपुरात तयारीला सुरूवात झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे नागपुरात पहिल्यांदाच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्तारात सर्वाधिक भाजपचे आमदार शपथ घेऊ शकतात. भाजपचे तब्बल 21, शिंदेंच्या शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादी 10 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. तीनही पक्षांतील संभाव्य मंत्र्यांची नावे समोर आली आहे. पण, अधिकृत नावे शपथविधीच्या दिवशीच समोर येतील.
हेही वाचा : शिंदेंच्या संभाव्य 12 मंत्र्यांची यादी समोर, बड्या नेत्यांना डच्चू; नव्या चेहऱ्यांना संधी