Homeमहाराष्ट्रMahayuti Oath Ceremony : आझाद मैदानात फक्त तीन जणांचा शपथविधी, काय आहे कारण...

Mahayuti Oath Ceremony : आझाद मैदानात फक्त तीन जणांचा शपथविधी, काय आहे कारण ? 

Subscribe

मुंबई – महायुतीचा सत्तास्थापनेचा मुहूर्त अवघ्या काही तासांवर आला आहे. त्यासोबतच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आझाद मैदानावर 5 डिसेंबरला होणाऱ्या शाही शपथविधी सोहळ्यात फक्त तिघांचाच शपथविधी होणार आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधी आझाद मैदानावर होणार आहे. मंत्रिमंडळाचा शपथविधी नागपूर अधिवेशनाआधी होण्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फार कमी वेळ महायुतीच्या शपथविधीसाठी दिल्याचीही माहिती आहे.

‘या’ तिघांचाच होणार शपथविधी 

महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावरुन गेल्या दहा दिवसांपासून खलबतं सुरु होती. अखेर आज भाजपचा गटनेता निवडला जाणार आहे. त्यानंतर दुपारी 3.30 वाजता महायुतीचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत. या भेटीत महायुतीचे नेते सत्तास्थापनेचे पत्र राज्यपालांना देणार आहे. त्यानंतर 5 डिसेंबर रोजी आझाद मैदानावर महायुती सरकारचा शपथविधी सोहळा होणार आहे. मात्र या शपथविधी सोहळ्यात फक्त तिघांचाच शपथविधी होणार असल्याची माहिती आहे.

मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री शपथ घेणार आहेत. मुख्यमंत्रीपदासाठीच्या स्पर्धेत भाजप नेते देवेंद्र फडणवीस हे सर्वात पुढे आहेत. त्यांच्याच नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपदासाठी राजी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. सर्वाधिकवेळा उपमुख्यमंत्री होण्याचा विक्रम अजित पवार करणार आहेत.

महायुतीतील भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षातील अनेक आमदार मंत्रिपदासाठी इच्छूक आहेत. आझाद मैदानावरच आपला शपथविधी व्हावा ही अनेकांची इच्छा आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फार कमी वेळ शपथविधी सोहळ्यासाठी दिला आहे. पंतप्रधान कार्यालयाने पंतप्रधानांचा मुंबई दौऱ्याचा वेळ वाढवून दिला तर इतरही मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

मंत्र्यांचा शपथविधी केव्हा?

महायुतीमध्ये मुख्यमंत्री कोण होणार यावर बराच खल झाला. शिवसेना नेते एकनाथ शिंदे बरेच दिवस आजारी होते, त्यामुळे खाते वाटपावरही चर्चा होऊ शकली नाही. त्यामुळे विक्रमी बहुमत मिळालेले असताना महायुतीला सरकार स्थापनेच उशिर झाल्याचे मानले जाते. तिन्ही पक्षांच्या प्रमुखांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर खातेवाटपावर चर्चा होऊन नागपूर अधिवेशनापूर्वी मंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा : Mahayuti Politics : भाजप गटनेता आज निवडला जाणार; कोण होणार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री?

Edited by – Unmesh Khandale