Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रMaharashtra Election Result 2024 : पश्चिम विदर्भात महायुतीचं मविआवर वर्चस्व; बच्चू कडूंचाही...

Maharashtra Election Result 2024 : पश्चिम विदर्भात महायुतीचं मविआवर वर्चस्व; बच्चू कडूंचाही पराभव

Subscribe

राज्यातील सर्व 288 मतदारासंघाचे निकाल समोर येत असून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचा गड असलेला विदर्भ आता महायुतीच्या ताब्यात गेला आहे. आतापर्यंत जवळपास 55 जागांवर महायुतीला, तर फक्त 7 जागांवर मविआला विजय मिळवता आला आहे.

यवतमाळ : पंधराव्या विधानसभा निवडणुकीसाठी 288 मतदारसंघात 20 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडली असून सर्वाधिक म्हणजे 66 टक्के मतदान झाले होते. यानंतर आज, शनिवारी (23 नोव्हेंबर) सर्व मतदारासंघाचे निकाल समोर येत असून महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे काँग्रेसचा गड असलेला विदर्भ आता महायुतीच्या ताब्यात गेला आहे. आतापर्यंत जवळपास 55 जागांवर महायुतीला, तर फक्त 7 जागांवर मविआला विजय मिळवता आला आहे. पश्चिम विदर्भात मविआच्या दोन नेत्यांना थोड्या अंतराने पराभवाला सामोरे जावे लागले आहे. तर निवडणुकीआधी महायुतीतून बाहेर पडलेल्या प्रहार संघटनेच्या बच्चू कडू यांनाही पराभव झाला आहे. (Mahayuti dominates Mahavikas Aghadi in West Vidarbha Bachchu Kadu also defeated)

यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघातील दिग्रस विधानसभेत काँग्रेसकडून महाविकास आघाडीचे माजी मंत्री माणिकराव ठाकरे आणि शिवसेनेचे संजय राठोड हे निवडणुकीच्या रिंगणात होते. खरं तर तब्बल 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच आजी-माजी मंत्र्यांमध्ये या मतदारसंघामध्ये थेट सामना होत होता. मात्र संजय राठोड यांनी याठिकाणी 28775 मतांनी मोठा विजय मिळवला. तर अमरावती मतदारसंघ हा नेहमीच काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र विधानसभा निवडणुकीच्या आधी सुलभा खोडके यांनी काँग्रेसमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. यानंतर त्यांना अमरावती मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली, तर काँग्रेसकडून सुनील देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात होते. याशिवाय भाजपामधून हकालपट्टी करण्यात आलेले बंडखोर उमेदवार जगदीश गुप्ता देखील निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यामुळे अटीतटीची लढ होण्याची शक्यता होती आणि झालेही तसेच. सुलभा खोडके यांना 5496 मतांनी विजय मिळवता आला.

- Advertisement -

हेही वाचा – CM Eknath Shinde : आमच्या लाडक्या बहिणींनी सावत्र भावांना जोडा दाखवला, शिंदेंचा टोला

मविआच्या जयश्री शेळकेंचा फक्त 1473 मतांनी पराभव

शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड आणि शिवसेना ठाकरे गटाच्या जयश्री शेळके, वंचित बहुजन आघाडीकडून प्रशांत वाघोदे आणि जयश्री रवींद्र शेळके असे साधर्म्य असलेली आणखी एक महिला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या. याचा फटका ठाकरे गटाच्या जयश्री शेळके यांना बसला. जयश्री शेळके यांनी 88 हजार 984 मतं मिळवली, मात्र त्यांना अवघ्या 1473 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला.

- Advertisement -

सरकार स्थापनेचा दावा करणाऱ्या बच्चू कडूंचा पराभव

महायुतीतून बाहेर पडल्यानंतर प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी व माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांना सोबत घेत महाराष्ट्रात परिवर्तन महाशक्ती या तिसऱ्या आघाडीची घोषणा केली होती. स्वत: ते अचलपूर मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात होते. विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीचे निकाल लागायच्या आधीच बच्चू कडू यांनी आपलंच सरकार स्थापन होणार असल्याचा दावा केला होता. मात्र भाजपा उमेदवार प्रवीण तायडे यांच्याकडून बच्चू कडूंना 12435 मतांनी पराभवाचा सामना करावा लागला.

हेही वाचा – Maharashtra Election Result 2024 : ठाकरेंच्या बालेकिल्लात महायुतीची जोरदार आघाडी; राणे बंधूंचा विजय


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -