मुंबई : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या महेश सावंत यांची बाजी मारली आहे. माहिम मतदारसंघातून माजी आमदार सदा सरवमकर आणि राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे या दोघांचा पराभव करत शिवसेनेचे महेश सावंत हे जायंट किलर ठरले आहेत. महेश सावंत यांच्या निवडणुकीतील दणदणीत विजयामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक होत होते. पण गुरुवारी संध्याकाळपासून महेश सावंत वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहेत. निवडणुकीतील कामकाजामुळे त्यांना त्रास झाला आहे. त्यामुळे सावंत यांना लिलावती रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. (Shvsena UBT group killer mahesh sawant in lilavati hospital.)
हेही वाचा : BJP : भाजपात बंडखोराच्या घरवापसीला आता निष्ठावंतांचा विरोध; नेमकं प्रकरण काय?
महेश सावंत यांना काल अचानक अस्वस्थ वाटत असल्याने, त्यांनी स्वत: रुग्णालयात जाऊन तपासणी केली. त्यानंतर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांची अँजिओग्राफी करण्यात आली. मात्र, अँजिओग्राफी केल्यानंतर हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांमध्ये एक ब्लॉकेज दिसल्याने डॉक्टरांकडून अँजिओप्लास्टीचा सल्ला देण्यात आला. त्यानंतर सावंत यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार अँजिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेतला. सावंत यांच्यावर काल त्वरीत अँजिओप्लास्टी करण्यात आली असून त्यांची प्रकृती आता व्यवस्थित असल्याचे सांगण्यात आले आहे. तसेच अपेक्षित सुधारणा दिसल्यास महेश सावंत यांना घरी जाण्याची परवानगी दिली जाईल, असे डॅाक्टरांनी सांगितले आहे.
हेही वाचा : Congress : नसीम खान यांची ईव्हीएमवर शंका; फेर मोजणीसाठी मोजले एवढे लाख रुपये
यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये माहीम मतदारसंघात शिवसेना उबाठा गटाचे महेश सावंत यांनी भगवा फडकवला आहे. सावंत यांनी माहिम मतदारसंघातून अमित ठाकरे आणि सदा सरवणकर यांचा पराभव केल्याचे दिसून आले आहे. या मतदारसंघात अवघ्या 1316 मतांनी ते विजयी झाले आहेत. तर, सदा सरवणकर यांना येथील मतदारसंघात 48,897 मते मिळाली आहेत. अमित ठाकरे यांनी 33,062 एवढी मते घेतली. त्यामुळे, महेश सावंत यांच्याकडून अमित ठाकरेंचा 17151 मतांनी पराभव झाला आहे. त्यामुळे, दोन दिग्गज उमेदवारांना पराभूत करुन महेश सावंत हे जायंट किलर ठरले आहेत.
Edited By Komal Pawar Govalkar