महिलेला मारहाण करणार्‍या मनसे पदाधिकार्‍याला तात्काळ अटक करावी, महेश तपासेंची मागणी

MAHESH TAPASE

मुंबई – ज्येष्ठ नागरिक महिलेला मारहाण करणार्‍या मनसे पदाधिकार्‍याला तात्काळ अटक करावी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे.

मुंबादेवी येथे गणपती डेकोरेशनचा मंडप रस्त्यात टाकणार्‍या मनसे पदाधिकार्‍याला अटकाव केल्याने चिडलेल्या मनसे पदाधिकार्‍याने एका ज्येष्ठ नागरिक महिलेच्या कानशिलात लगावली ही पुरोगामी महाराष्ट्रात दुर्दैवी आणि निषेधार्ह बाब आहे असेही महेश तपासे म्हणाले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांकडून महिलेला मारहाण केल्याची धक्कादायक घटना मुंबईच्या मुंबादेवी परिसरात घडली. सध्या गणेशोत्सव सुरू असून, सर्वत्र पक्षाचे बॅनर लावले जात आहे. मात्र या बॅनर लावण्यावरून मनसेच्या कार्यकर्त्यांनी महिलेला मारहाण केली आहे. प्रकाश देवी असे पीडित महिलेचे नाव असून, त्यांच्या मेडीकलसमोर मनसेचे कार्यकर्ते खांब उभे करून बॅनर लावत होते. तेव्हा महिलेने या बॅनर लावण्याला विरोध केला असता, तिला मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.


हेही वाचा : मुंबादेवी परिसरात बॅनर लावण्यावरून मनसे कार्यकर्त्यांची महिलेला मारहाण, व्हिडीओ व्हायरल