भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्याने केलेल्या वक्तव्याबद्दल वैयक्तिक माफी मागावी – महेश तपासे

हेतुपुरस्कर पैगंबरांचा अपमान करणाऱ्या भाजप प्रवक्त्याच्या वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस निषेध करत असून भाजप प्रवक्त्यांना अशाप्रकारचे प्रशिक्षण देते का? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. भाजपचे प्रवक्ते सतत विष ओकणारे… द्वेष करणारे झाले आहेत. त्यांच्या कृत्यामुळे देशाच्या धर्मनिरपेक्षतेची आंतरराष्ट्रीय स्तरावर कधीही भरून न येणारी अशी हानी झाली आहे असेही महेश तपासे म्हणाले.

भाजपच्या एका विशिष्ट प्रवक्त्याने केलेल्या सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील विधानावर तात्काळ अ‍ॅक्शन घेऊन काही अरबी देशांनी भारतीय उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. काहींनी तर भारतीय पंतप्रधान मोदींचे छायाचित्र कचऱ्याच्या डब्यावर लावले आहे जे पूर्णपणे चुकीचे आहे असेही महेश तपासे यांनी सांगितले.

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांना राष्ट्रवादी काँग्रेसने विनंती केली की, त्यांनी आपल्या राजकीय संबंधांचा वापर करून भारतीय पंतप्रधानांचा अपमान होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि भारतीय उत्पादनांवर झालेला बहिष्कार उठवावा अशी मागणीही महेश तपासे यांनी केली.

भाजप अध्यक्ष जेपी नड्डा यांनी त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्याने केलेल्या वक्तव्याबद्दल संपूर्ण मुस्लिम जातीची वैयक्तिक माफी मागावी. भाजपने सर्व धर्माचा आदर करायला शिकावे अशी मागणीही राष्ट्रवादीचे महेश तपासे यांनी केली.


हेही वाचा : राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढ; मुंबई पोलिसांनी बजावली नोटीस