घरताज्या घडामोडीवाडिया रुग्णालयात भीषण आगीमुळे खळबळ; चिमुकले सुरक्षित

वाडिया रुग्णालयात भीषण आगीमुळे खळबळ; चिमुकले सुरक्षित

Subscribe

मुंबई : परळ येथील लहान मुलांच्या तळमजला अधिक दोन मजली ‘वाडिया’ रुग्णालयातील पहिल्या मजल्यावरील ऑपरेशन थिएटर येथील यूपीएस रूममध्ये शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेमुळे रुग्णालय व परिसरात एकच खळबळ उडाली. रूग्णालय प्रशासनाने सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्काळ रुग्णालय कक्षात दाखल लहान मुलांना, रुग्णांना व त्यांच्या नातेवाईकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केल्याने कोणीही जखमी झालेले नाही.

सदर रुग्णालयात नियमित स्वरूपात दररोज किमान ३०० लहान मुलांवर उपचार करण्यात येतात. त्यामुळे या भीषण आगीतून लहान मुले व त्यांचे नातेवाईक हे थोडक्यात बचावल्याचे समजते. सदर आगीवर रात्री उशिरापर्यंत नियंत्रण मिळवून आग पूर्णपणे विझविण्यात आली. प्राप्त माहितीनुसार, परळ येथील ‘वाडिया’ हे तळमजला अधिक दोन मजली रूग्णालय लहान मुलांच्या आजारावर चांगले व माफक दरात उपचार करण्यात प्रसिद्ध आहे. या रुग्णालयात दररोज आजारी लहान मुले, त्यांचे नातेवाईक यांची नेहमीच गर्दी असते. या रुग्णालयातील पहिल्या मजल्यावरील बंद स्थितीत असलेल्या ऑपरेशन थिएटरच्या ठिकाणी यूपीएस रूममध्ये शुक्रवारी सायंकाळी ७.४५ वाजताच्या सुमारास अचानकपणे आग लागली.

- Advertisement -

या यूपीएस रूममध्ये बॅटरीज ठेवलेल्या असतात. तसेच, तेथे सक्शन बॉक्सही आहे. नेमके याच ठिकाणी कदाचित शॉर्टसर्किट झाल्याने सपार्किंग होऊन आग लागली. या आगीत इलेक्ट्रिक वायरिंग, इलेक्ट्रिक उपकरणे, लाकडी फर्निचर, दरवाजे, खिडक्या जळाल्याने मोठ्या प्रमाणात धूर निर्माण झाला. ह्या आगीचा धूर पहिल्या व दुसऱ्या मजल्यावर पसरला. त्यामुळे आगीची माहिती मिळताच रुग्णालयात एकच खळबळ उडाली.

आगी लागल्याचे समजताच रूग्णालय प्रशासन व रूग्णालयातील रुग्णांचे नातेवाईक व रुग्ण लहान मुले भयभीत झाले. रुग्णालयात एकच धावपळ झाली. रुग्णालय प्रशासन, डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांनी तात्काळ आग लागलेल्या परिसरातील रुग्ण कक्षेत दाखल रुग्ण लहान मुले, त्यांचे नातेवाईक यांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित केल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे या आगीत कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.

- Advertisement -

विशेष म्हणजे आग लागल्यानंतर इलेक्ट्रिक वायरिंग व लाकडी फर्निचर यांमुळे आग सायंकाळी ७.०५ वाजतच्या सुमारास जास्त भडकली. दरम्यान, आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ आग विझविण्याचे व रुग्णांसह नातेवाईकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू केले होते. अग्निशमन दलाने ८ फायर इंजिन व ६ वॉटर टॅंकर यांच्या साहाय्याने रात्री ८ वाजताच्या सुमारास आग सर्व बाजूने कव्हर करण्यात आली. तसेच, अग्निशमन दलाला आग विझविण्यासाठी वाडिया रूग्णालयासमोरील रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाला मोठी मदत झाली.

माजी नगरसेविका सिंधू मसुरकर, शिवसैनिकांची रुग्णालयात धाव

वाडिया रुग्णालयात आग लागल्याची माहिती शिवसेनेचे स्थानिक आमदार अजय चौधरी यांना समजली. त्यांनी तात्काळ शिवसेना शाखेत यायला निघालेल्या माजी नगरसेविका सिंधू मसुरकर यांना संपर्क करून रुग्णालयात मदतीसाठी पाठवले. सिंधू मसुरकर यांनी शाखाप्रमुख अनिल गावकर व अन्य शिवसैनिकांसह वाडिया रुग्णालयात धाव घेऊन बचावकार्य सुरू केले.

रुग्ण सुरक्षित : सिंधू मसुरकर, माजी नगरसेविका

आम्ही जेव्हा रुग्णालयात पोहोचलो तेव्हा ऑपरेशन थिएटरमध्ये आग लागलेली नव्हती. इलेक्ट्रिक सक्शन बॉक्सच्या ठिकाणी स्पार्किंग होऊन आग लागल्याचे आम्हाला समजले. आम्ही शिवसैनिकांनी अग्निशमन दलाला बचावकार्यात मदत केली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही, अशी माहिती घटनास्थळी हजर शिवसेनेच्या माजी नगरसेविका सिंधू मसुरकर यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली. गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत करणारे शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनीही सदर रुग्णालयात लागलेली आग फार मोठी नव्हती मात्र अग्निशमन दलाने सदर आगीवर काही अवधीतच नियंत्रण मिळविल्याने पुढील अनर्थ टळला, अशी माहिती दिली.

प्राथमिक माहितीप्रमाणे यूपीएस रूममध्ये आग

अग्निशमन दलाला सदर आगीची खबर सायंकाळी ६.५१ वाजता देण्यात आली. तात्काळ अग्निशमन दलाने घटनास्थळी ८ फायर इंजिन, ६ वॉटर टॅंकर यांच्या यांसह घटनास्थळी धाव घेऊन युद्धपातळीवर आग विझविण्याचे व मदतीचे काम सुरू केले. प्राथमिक माहितीनुसार, रुग्णालयांतील ऑपरेशन थिएटर येथील यूपीएस रूममध्ये जेथे इलेक्ट्रिक चार्जिंग बॅटरी ठेवण्यात येतात, त्याठिकाणी आग लागल्याची माहिती मिळाली आहे. मात्र आग विझल्यानंतर आगीची चौकशी केल्यावर त्यात आगीचे कारण स्पष्ट होईल, असे अग्निशमन दलाचे तांत्रिक सल्लागार राजेंद्र चौधरी यांनी आमच्या प्रतिनिधिंशी बोलताना दिली.

खासदार अरविंद सावंतांनी दिली घटनास्थळी भेट

मी वाडिया रुग्णालयात भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी मला रुग्णालय प्रशासनाने आगीबाबत माहिती दिली. त्यानुसार, पहिल्या मजल्यावर ऑपरेशन थिएटर असून त्याचे आगीत मोठे नुकसान झाले आहे. मात्र वाडिया रुग्णालयाचे डॉक्टर, नर्स, कर्मचारी यांनी चांगले काम करून वेळीच रुग्ण, नातेवाईक यांना सुरक्षित स्थळी हलवले. त्यामुळे कोणीही जखमी झाले नाही, असं शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत म्हणाले.


हेही वाचा : …तर मुख्यमंत्री आजारी पडले नसते, अजित पवारांची मिश्कील टिप्पणी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -