राज्यसभेची निवडणूक बिनविरोध करा, मविआचा देवेंद्र फडणवीसांना प्रस्ताव

भाजपनं सहाव्या जागेवरील उमेदवार मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांसमोर ठेवला आहे. त्यामुळे आता भाजप राज्यसभेच्या सहाव्या जागेवरचा उमेदवार मागे घेते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

मुंबईः राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळानं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी महाविकास आघाडीचं शिष्टमंडळ गेलं असता त्यात अनिल देसाई, छगन भुजबळ, सुनील केदार उपस्थित होते. या बैठकीला भाजपकडून देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील बैठकीत होते. पण या बैठकीत काय चर्चा झाली हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.

राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपनं कोल्हापुरातील धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिल्यानं महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये मोठी रस्सीखेच झाली आहे. विशेष म्हणजे सहावी जागा जिंकण्यासाठी कोणाकडेही पुरेशी मते नाहीत, त्यामुळे घोडेबाजार होण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. भाजपनं सहाव्या जागेवरील उमेदवार मागे घेऊन निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या नेत्यांनी देवेंद्र फडणवीसांसमोर ठेवला आहे. त्यामुळे आता भाजप राज्यसभेच्या सहाव्या जागेवरचा उमेदवार मागे घेते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

दुसरीकडे राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक होत आहे. 10 जूनला निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. परंतु राज्यसभेच्या 6 जागांसाठी एकूण 7 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसकडून प्रत्येकी 1 तर शिवसेनेकडून 2 आणि भाजपकडून 3 उमेदवार रिंगणात आहेत. सहाव्या जागेसाठी चुरस होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांनी अधिकची मते शिवसेनेला द्यावीत, असे आदेशही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले आहेत.

राज्यसभेच्या सहा जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची उर्वरित 11 मते शिवसेनेचे उमेदवार संजय पवार यांना देण्याचे आदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी पक्षाच्या आमदारांना दिले होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित करण्यात आली होती. शरद पवार बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. येत्या 10 जूनला होणारी राज्यभेची निवडणूक आणि राज्यातील आगामी पालिका निवडणुकांबाबत शरद पवार यांनी मार्गदर्शन केले होते.


हेही वाचाः Rajya Sabha Election : राज्यसभेसाठी अधिकची मते शिवसेनेला द्या, शरद पवारांचे राष्ट्रवादीच्या आमदारांना आदेश