हातात तलवारी नाचवत रिल्स बनवणे पडले दोघांना महागात

नाशिक : इंस्टाग्रामवर घातक हत्यारांसह रिल्स बनवून स्टेट ठेवणे दोन तरुणांना चांगलच महागात पडले. नाशिक शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या पथकाने हत्यारांसह दोघांना अटक केली आहे. फैजान नईम शेख (१९, रा. भारतनगर), सचिन शरद इंगोले (२८, रा. भारतनगर) अशी दोघा संशयितांची नावे आहेत.

नाशिक शहर गुन्हे शाखा युनिट एकचे पोलीस अंमलदार मुक्तार शेख यांना संशयित तरुण इन्स्ट्राग्रामवर घातक हत्यारांसह रिल्स बनवून चमकोगिरी करीत असल्याची माहिती मिळाली. शेख यांनी गुन्हे शाखा युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना माहिती दिली. त्यांच्या सुचनेनुसार पथकाने भारतनगरमधून संशयित फैजान शेख यास ताब्यात घेत चौकशी केली. त्यावेळी त्याच्याकडून स्टीलची धारदार तलवार जप्त करण्यात आली. हत्यारांबाबत चौकशीत त्याने संशयित सचिन इंगोले याच्याकडून घेतल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी संशयित इंगोले यास अटक केली. त्याच्याकडून पोलिसांनी धारदार लोखंडी गुप्ती जप्त केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, ही कामगिरी आयुक्त अंकुश शिंदे, उपायुक्त प्रशांत बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ, पोलीस हवालदार प्रवीण वाघमारे, प्रदीप म्हसदे, नाझीम खान पठाण, शरद सोनवणे, आसिफ तांबोळी, प्रशांत मरकड, विशाल देवरे, महेश साळुंके यांनी केली.