घरताज्या घडामोडी'हेल्लो, अजित पवार बोलतोय! ती प्रॉपर्टी विकून टाका'; बोगस कॉलरला अटक

‘हेल्लो, अजित पवार बोलतोय! ती प्रॉपर्टी विकून टाका’; बोगस कॉलरला अटक

Subscribe

उपमुख्यमंत्री अजित पवार असल्याचे भासवून एका प्रॉपर्टी प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या २५ वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. एका कुटुंबाला फोनवर अजित पवार असल्याचे सांगून त्यांच्यात सुरु असलेला प्रॉपर्टी वाद मिटवण्याचा सल्ला या आरोपीने दिला होता. गुरुवारी पुणे पोलिसांनी या बोगस अजितदादाला अटक केली. पुणे जिल्ह्यात अजित पवार यांच्या शब्दाला किंमत आहे. बारामती मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत असले तरी अजित पवार यांची पुण्यावर बारीक नजर असते. सध्या ते पुण्याचे पालकमंत्री देखील आहेत. या सर्व परिस्थितीचा फायदा घेऊन आरोपीने अजित पवार यांचे नाव वापरल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पुण्याच्या दौंड तालुक्यातील खडकी गावातील एका कुटुंबात प्रॉपर्टीवरुन वाद सुरु होता. एका सुनेला आपली वडिलोपार्जित मालमत्ता विकायची होती, तर दुसऱ्या सुनेचा मालमत्ता विकण्यास विरोध होता. अटक करण्यात आलेला आरोपी हा त्याच गावात राहणारा आहे. त्याने २ सप्टेंबर रोजी संबंधित कुटुंबातील एका ज्येष्ठ व्यक्तिला फोन करुन ही मालमत्ता विकण्यासाठी परवानगी द्यावी, अशी सूचना केली.

- Advertisement -

मात्र या कुटुंबातील सदस्यांना हा बोगस कॉल असल्याची कुणकुण लागली आणि त्यांनी थेट पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांनी तपास चक्र फिरवून आरोपीला अटक केल्यानंतर त्याने आपला गुन्हा मान्य केला. मला फक्त त्या कुटुंबाला मालमत्ता विकण्यासाठी घाबरवायचे होते, असे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी आरोपीवर भारतीय दंड विधान कलम १७० (सरकारी व्यक्ती असल्याचे भासवणे) आणि ५०७ (अज्ञात संभाषणाद्वारे धमकी देणे) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान अजित पवारांच्या कार्यकुशलतेचा अनुभव पुणेकर नेहमीच घेत असतात. आजच भल्या पहाटे अजित पवार यांनी थेट पुणे मेट्रोला भेट दिली. सहा वाजता ते मेट्रोचे काम पाहण्यास पोहोचले. संत तुकाराम नगर येथे मेट्रोचे पहिले तिकीट घेऊन अजित पवार यांनी मेट्रोचा प्रवास देखील केला. मंत्रालयातील अधिकाऱ्यांना अजितदादांच्या काटेकोर वेळापत्रकाचा चांगलाच अनुभव आहे. आज तो मेट्रोतील अधिकाऱ्यांनाही आला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -