घरमहाराष्ट्रअवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक चिंतेत

अवकाळी पावसामुळे आंबा उत्पादक चिंतेत

Subscribe

रब्बीचे पीकही धोक्यात

गेले दोन दिवस असलेले ढगाळ वातावरण आणि गुरुवारी पडलेल्या अवकाळी पावसामुळे महाडसह मुरुड तालुक्यात आंबा उत्पादक मात्र चांगलेच धास्तावले आहेत. वातावरण पूर्ववत झाले नाही तर नुकसानीच्या शक्यतेने त्यांना ग्रासले आहे. रब्बीचेही पीक या वातावरणामुळे अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

अलीकडे काही दिवस वातावरणात उष्मा जाणवत होता. थंडीचा हंगाम असतानाही तिचा जरासाही लवलेश नव्हता. बुधवारपासून ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे पावसाची शक्यता निर्माण झाली होती. पहाटे पडलेल्या दवाचा सर्वाधिक फटका बसणार आहे तो आंबा पिकाला! यावर्षी परतीचा पाऊस लांबल्याने भातपीक कापणीलादेखील उशीर झाला. यामुळे रब्बी हंगामातील कडधान्य पेरणीही उशिराने झाली. लांबलेल्या पावसामुळे शेतकरी अडचणीत आलेला असतानाच पुन्हा एकदा पाऊस परत आल्याने आंबा पीक धोक्यात आले आहे.

- Advertisement -

महाड, पोलादपूर, तसेच शेजारच्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडणगड तालुक्यातून आंबा उत्पादक मोठ्या प्रमाणावर आहेत. दापोली, मंडणगड येथील आंबा उत्पादक त्यांचे पीक विक्रीला मुंबई आणि अन्य शहरात घेऊन जातात. यावर्षी आंबा पीक आधीच उशिराने येण्याची शक्यता असताना पडलेल्या पावसामुळे पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अद्याप काही भागात आंब्याला मोहर आलेला नाही, तर आलेला मोहर या पावसामुळे गळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुरुड तालुक्यात गेले तीन दिवस ढगाळ वातावरण आहे. काही ठिकाणी अवेळी पावसाचा शिडकावा झाल्याने आंबा आणि काजू बागायतदार हैराण झाले आहेत. तालुक्यात ३९०० हेक्टर क्षेत्रापैकी ९०० हेक्टर क्षेत्रात आंब्याची लागवड केली जाते. मुरुड तालुक्यातून सुमारे साडेतीन कोटी रुपयांची उलाढाल एकट्या आंबा पिकातून होत असते. आंब्याच्या पिकाला आवश्यक असणारी थंडीच गायब असल्याने बागायतदार चिंतेत आहेत.

- Advertisement -

परतीच्या पावसामुळे आधीच आंबा मोहर लांबलेला आहे. त्यातच पाऊस पडल्याने आंबा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. याकरिता शेतकर्‍यांनी कीटकनाशक आणि बुरशीनाशक फवारणी करणे आवश्यक आहे.
-कैलास पवार, कृषी अधिकारी, पोलादपूर

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -