उल्हासनगर : महापालिकेचे आयुक्त विकास ढाकणे यांची नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात उपसचिव पदी नियुक्ती झाली आहे. त्यांचा उल्हासनगर महापालिकेतील कार्यकाळ अल्प ठरला. त्यांच्या बदलीनंतर उल्हासनगरच्या आयुक्त पदावर कुणाची वर्णी लागते? याची चर्चा रंगली होती. अशातच पुणे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या नियुक्तीने उल्हासनगर महापालिकेला पहिल्यांदाच महिला आयुक्त मिळाल्या आहेत. तसेच मनीषा आव्हाळे यांच्या नियुक्तीने पालिका प्रशासनात महिला राजला चालना मिळाली आहे. (Manisha Awhale appointed as Commissioner of Ulhasnagar Municipal Corporation)
नगरपरिषदेचे रूपांतर 1996 साली उल्हासनगर महानगरपालिकेत झाले. तेव्हापासून पुरुष अधिकाऱ्यांना महानगरपालिकेत आयुक्तांचा आणि अधिकांश महिलांना महापौर पदाचा मान मिळाला आहे. मात्र महानगरपालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच विदर्भकन्या आयएएस मनिषा आव्हाळे या महिला अधिकाऱ्याची आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिवांनी याबाबत आदेश जाहीर केले आहेत. त्यामुळे आता उल्हासनगर महापालिकेला आर्थिक शिस्त लावणे, शहरातील अनधिकृत बांधकामे आणि पुनर्विकासाचा महत्त्वाचा प्रश्न, रस्ते विकासासह शहरात सुरू असलेल्या कोट्यवधींच्या कामाचा दर्जा राखणे अशी अनेक आव्हाने मनीषा आव्हाळे यांच्यापुढे असणार आहेत. याशिवाय येत्या काळात उल्हासनगर महापालिका निवडणुका होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मनीषा आव्हाळे यांची नियुक्ती महत्त्वाची मानली जात आहे.
हेही वाचा – Eknath Shinde : पालकमंत्रिपदावरून महायुतीत धुसफूस, शिंदे दरे गावी गेल्याने नाराज असल्याची चर्चा
उल्हासनगर पालिका प्रशासनात महिला राज
दरम्यान, उल्हासनगर महानगरपालिकेत यापूर्वी प्रतिनियुक्तीवर अतिरिक्त आयुक्त विजया कंठे, करुणा जुईकर, उपायुक्त संगीता धायगुडे, प्रियंका राजपूत, सहायक आयुक्त मंगला माळवे यांनी पदभार हाताळला आहे. विद्यमान घडीला प्रतिनियुक्तीवर उपायुक्त विशाखा मोटघरे, सहायक आयुक्त मयुरी कदम कार्यरत आहेत. तर महानगरपालिकेतील विविध पदांवर सचिव प्राजक्ता कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी छाया डांगळे, कर निर्धारक व संकलक निलम कदम, प्रभारी प्रशासनाधिकारी कुंदा पंडित, प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त अलका पवार, सलोनी निवकर, सिस्टम अनालिस्ट श्रद्धा बाविस्कर, मालमत्ता व्यवस्थापक मधुरा केणी, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान विभागाच्या संजीवनी अमृतसागर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी मोहिनी धर्मा या महिला काम करत आहेत.
हेही वाचा – Suresh Dhas : बीडचं पालकमंत्रिपद का मिळाल नाही? सुरेश धसांनी सांगितली आतली बातमी