चाकणकरांच्या मदतीला शिवसेनेची रणरागिणी; चित्रा वाघ यांचा घेतला खरपूस समाचार

mla manisha kayande
आमदार मनीषा कायंदे

राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नावाची चर्चा सुरु असताना भाजप महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी रावणाला मदत करणारी शुर्पणखा बसवू नका, असं ट्विट केलं. यानंतर राजकीय वातावरण तापलं. दरम्यान, रुपाली चाकणकर यांच्या मदतीला शिवसेनेची रणरागिणी धावून आली आहे. शिवसेनेच्या आमदार आणि प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी चित्रा वाघ यांचा खरपूस समाचार घेतला.

एका महिलेला दुसऱ्या महिलेची प्रगती आवडली नाही. चित्रा वाघ यांनी आपण कोणत्या मनोवृत्तीचे आहोत हे दाखवून दिलं आहे, अशी खरमरीत टीका मनीषा कायंदे यांनी केली. पुढे बोलताना त्यांनी खरंतर एक सहकारी म्हणून त्यांनी रुपाली चाकणकर यांना शुभेच्छा द्यायला हव्या होत्या. परंतु त्यांनी चाकणकर यांना शुर्पणखेची उपमा देत त्यांनी मत्सरी मानसिकतेचे दर्शन घडवून आणलं आहे. चित्राताई वाघ यांना एखादं मानाचं पद मिळालं तर आम्ही त्यांचं अभिनंदन केलं असतं, असा चिमटा देखील कायंदे यांनी काढला.

काय म्हणाल्या चित्रा वाघ?

“महिलांचे शील भ्रष्ट करणारे रावण राजरोस फिरताहेत पण राज्य महिला आयोगाला अद्याप अध्यक्ष नाही हे लाजिरवाणं आहे. अध्यक्ष लवकर नेमावा पण महिलांच्या क्षेत्रात काम करणारी कोणी अनुभवी मिळत नसेल तर किमान रावणाला मदत करणारी ‘शुर्पणखा’ बसवू नका. अन्यथा प्रत्येकवेळी सरकारचंच नाक कापलं जाईल,” असं चित्रा वाघ यांनी ट्विट केलं होतं.