घरमहाराष्ट्र'मनोहर पर्रीकर : साधी राहणी, उच्च विचारसरणी' पुस्तकाचे गोव्यात प्रकाशन

‘मनोहर पर्रीकर : साधी राहणी, उच्च विचारसरणी’ पुस्तकाचे गोव्यात प्रकाशन

Subscribe

पणजी – माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त शुक्रवारी नितीन गोखले यांनी लिहिलेल्या ‘Manohar Parrikar : Brilliant Mind, Simple Life’ या पुस्तकाचा मराठी अनुवाद ‘मनोहर पर्रीकर : साधी राहणी, उच्च विचारसरणी’ याचे प्रकाशन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले. हा मराठी अनुवाद आराधना जोशी यांनी केला आहे. यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, मुख्यमंत्री प्रमोद सावंत, वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो, मुख्य अतिथी लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे (निवृत्त), तेजेंद्र लवंदे, उत्पल पर्रीकर, आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला टेबल कॅलेंडरचे प्रकाशन करण्यात आले. त्यानंतर मनोहर पर्रीकर यांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला. “आपले संरक्षण केवळ संरक्षण मंत्रालयाशी संबंधित नाही. भारताचे संरक्षण ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. स्व. मनोहर पर्रीकर यांनी आपल्या कार्यातून तसे दाखवून दिले आहे, असं मुख्य अतिथी लेफ्टनंट जनरल विनोद खंदारे (निवृत्त) म्हणाले. मनोहर पर्रीकर यांनी दूरदृष्टी ठेवून गोव्याचा विकास साधला. त्यांचे व आपले नाते हे केवळ राजकारणी एवढ्यापुरतेच मर्यादित नव्हते, तर मित्रत्वाचेही होते, असं म्हणत माविन गुदिन्हो यांनी त्यांच्या मैत्रीच्या आठवणींना उजाळा दिला. राज्यपाल पिल्लई यांनीही मनोहर पर्रीकर यांचे गोव्याच्या विकासाताली योगदान स्पष्ट केले. पर्रीकर हे केवळ गोव्याचे नेतृत्व नव्हते, तर ते भारताचे उत्तम नेतृत्व करणारा कणखर नेता होता, अशा शब्दांत पिल्लई यांनी गौरवोद्गार काढले.

- Advertisement -

मनोहर पर्रीकर स्कॉलर शिष्यवृत्ती सुरू राहणार

गोव्यात आयआयटी उभी व्हावी, यासाठी मनोहर पर्रीकर आग्रही होते. विद्यमान सरकारने त्यांचे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्यक्ष झोकून दिल्याचे सांगितले. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, काणकोण येथे पुलाला दिलेले मनोहर पर्रीकर हे नाव तसेच विद्यार्थ्यांना देण्यात येणारी मनोहर पर्रीकर स्कॉलर शिष्यवृत्ती यापुढेही देण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.

- Advertisement -

राष्ट्रकार्याला महत्त्व देणारे व्यक्तिमत्त्व

राज्याला केवळ नेता लाभला नव्हता, तर माझ्या वडिलांच्या रुपाने आधार देणारी व्यक्ती लाभली. घरचा विचार न करता प्रथम राष्ट्रकार्याला महत्त्व देणारे व्यक्तिमत्व म्हणजेच मनोहर पर्रीकर होते. सर्जिकल स्ट्राईक राबविताना जवानांनाही बाधा पोचू नये, याची काळजी घेणारे म्हणजे मनोहर पर्रीकर हे होते आणि आम्हाला त्यांचा अभिमान आहे, अशा शब्दात उत्पल पर्रीकर यांनी त्यांच्या कार्याला उजाळा दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -