जालना : गेल्या 11 दिवसांपासून जालना जिल्ह्यातील अंतरवली सराटी गावात मराठा समन्वयक मनोज जरांगे हे मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणावर बसलेले आहेत. या महिन्यात 01 सप्टेंबर रोजी त्यांच्या या बेमुदत उपोषणाच्या आंदोलनात पोलिसांकडून लाठीहल्ला करण्यात आला. यामध्ये आंदोलनाला बसलेले अनेक मराठा आंदोलक गंभीर जखमी झाले. यानंतर या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटू लागले असून या घटनेमुळे राज्य सरकारला मराठा आरक्षणासंदर्भात पुन्हा एकदा जाग आली आहे. गेल्या आठवड्याभरापासून जरांगे यांच्यासोबत सरकारडून पुन्हा मराठा आरक्षणावर बातचीत सुरू करण्यात आलेली आहे. जरांगे यांनी त्यांचे उपोषण मागे घ्यावे, अशी विनंती राज्य सरकारकडून वारंवार करण्यात येत आहे. परंतु राज्य सरकारने नवीन जीआर काढत मराठा समाजाला सरसकट जात प्रमाणपत्र द्यावे, या मागणीवर जरांगे हे ठाम राहिलेले आहेत. मात्र, या सर्वांमध्ये महत्त्वाची बाब आहे ती म्हणजे मराठा समाजातील उपजाती संदर्भातली. (Manoj Jarange explained the position regarding 96 Kuli Marathas)
हेही वाचा – जालन्याचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार, तरी जरांगे पाटलांचा सरकारला इशारा; म्हणाले…
मराठा समाजामध्ये केवळ मराठा ही एकच जात नसून त्यामध्ये कोणी 96 कुळी, तर कोणी 92 कुळी असल्याचेही दावा करते. ज्यामुळे आता या उपजाती असणाऱ्या लोकांना कुणबी बनवलेले चालणार आहे का? असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झालेला आहे. त्यामुळे याबाबत जरांगे यांच्याकडून स्पष्ट भूमिका घेण्यात आलेली आहे. ज्या लोकांना वाटते की त्यांना कुणबी म्हटलेले चालेल, त्यांनी हमखास जातप्रमाणपत्र घ्यावे, असे आवाहन जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आलेले आहे. परंतु जर का मराठा समाजातील उपजाती असलेल्या काही लोकांना वाटते की त्यांना कुणबी म्हणून घ्यायचे नाहीये. तर त्यांनी प्रमाणपत्र घेऊ नये. तुम्हाला कोणी जोरजबरदस्ती केलेली नाही, अशी स्पष्ट भूमिका मनोज जरांगे यांच्याकडून जाहीर करण्यात आलेली आहे.
मनोज जरांगे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मराठा समाजात असलेल्या उपजातींसंदर्भात म्हटले आहे की, आमचे म्हणणे असे आहे की, ज्यांना ९६ कुळी राहायचे आहे किंवा त्याला कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे नाही. अशा लोकांनी कुणबी प्रमाणपत्र घेऊ नये. त्यांना जबरदस्ती केली जाणार नाही. त्यांनी बिंदास्त मोकळे राहावे. त्यांनी मोठा पाटील किंवा बारीक पाटील, जसे राहायचे तसं राहावे. पण गोरगरीब पोरांचे कल्याण होऊ द्या, त्यांनी कुणबी जात प्रमाणपत्राला विरोध करू नये,” असे थेट आवाहन जरांगे यांच्याकडून करण्यात आलेले आहे.
तसेच, तुम्हाला कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे नसेल तर घेऊ नका. तुम्हाला जोरजबरदस्ती केली नाही. तुम्हाला जेव्हा 30-40 वर्षांनी वाटेल, की आता कुणबी प्रमाणपत्र घ्यायला हवे, तेव्हा त्यांनी कुणबी प्रमाणपत्र काढावे. तोपर्यंत मोठा पाटील म्हणून राहा. वाड्यावर राहा. बंगल्यावर राहा. रानात जाऊन राहा नाहीतर तिकडे डांबरीवर जाऊन झोपा…, अशी रोखठोक भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली आहे.