घरठाणे"...तर जरुर गुन्हे दाखल करा", मनोज जरांगेंचे सरकारला थेट आव्हान

“…तर जरुर गुन्हे दाखल करा”, मनोज जरांगेंचे सरकारला थेट आव्हान

Subscribe

ठाण्यातील सभेमधून मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत जागे राहण्याचे, एकजूट राहण्याचे आवाहन करत सरकारवर निशाणा साधला. तर सरकारला थेट गुन्हे दाखल करण्याचे एक प्रकारे खुले आव्हान केले आहे.

ठाणे : मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा आता तिव्र झाला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. यासाठी जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे आता या दरम्यानच्या कालावधीत मनोज जरांगे पाटील हे राज्यभरात दौरा करून मराठा समाजाची भेट घेणार आहेत. काल पुण्यातील खराडी येथे सभा झाल्यानंतर आज (ता. 21 नोव्हेंबर) जरांगेंची तोफ ठाण्यातील रंगायत नाट्यगृहात धडाडली. जरांगे यांचे ठाण्यात जंगी स्वागत करण्यात आले. मराठा समाजाने बाईक रॅली काढत जरांगेंवर फुलांची उधळण केली. यावेळी त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत जागे राहण्याचे, एकजूट राहण्याचे आवाहन करत सरकारवर निशाणा साधला. तर सरकारला थेट गुन्हे दाखल करण्याचे एक प्रकारे खुले आव्हान केले आहे. (Manoj Jarange Patil direct challenge to government to file cases against Maratha protesters)

हेही वाचा – मला आता अभ्यास करायला वेळ नाही, छगन भुजबळांना मनोज जरांगेंचा टोला

- Advertisement -

यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शब्दाचा दोन वेळा मान राखला. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आमच्याकडे वेळेची मागणी केली. आम्ही त्यांना 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतर आम्ही कोणाचे ऐकणार नाही. आम्हाला 24 डिसेंबरपूर्वी आरक्षण हवे आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमचे सांगणे आहे की, आम्ही शांततेची बाजू मांडत आहोत. परंतु, बाकीच्या लोकांना राज्यात दंगल भडकावी असे वाटत आहे. आम्ही शांततेचे आवाहन करत आहोत. हे चुकीचे आहे का?, असा प्रश्न या सभेतून जरांगे यांनी उपस्थित केला आहे.

तसेच, मराठा बांधव एकमेकांना अडी-अडचणीत मदत करतात. रात्री बेरात्री जरी काही अडचण आली तर आपण एकमेकांची मदत करतो. मात्र यांच्या राजकीय स्वार्थासाठी आपण आपल्यात वाद होऊ द्यायचे नाहीत. दंगली होऊ द्यायच्या नाहीत. हे आम्ही रात्रंदिवस सांगतो आहोत. पण ज्या लोकांनी कार्यक्रम घेतले. त्यांच्यावरच तुम्ही गुन्हे दाखल करत आहात. पण जरी तुम्ही गुन्हे दाखल केले. तरी आम्ही थांबणार आहोत का? राज्यात शांतता राहावी म्हणून आमच्यावर गुन्हे दाखल करत आहात, तर जरुर गुन्हे दाखल करा. ते गुन्हे आम्ही अंगावर घेऊ, असा थेट इशाराच जरांगे यांच्याकडून देण्यात आला आहे.

- Advertisement -

शांत रहा म्हणून मराठ्यांना आपण रात्रंदिवस आवाहन करत आहोत. यात काय वाईट काम करत आहोत. शासन आणि प्रशासनाचे हे काम आहे, पण आम्ही रात्रंदिवस जागून राज्यातील कायदा सुव्यवस्था कायम राहावी, म्हणून प्रयत्न करत आहोत. कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून पोलीस देखील रात्रंदिवस जागतात. शांतता राहावी म्हणून आम्ही देखील दिवस रात्र जागत आहोत. मात्र, असे असताना आमच्यावर गुन्हे दाखल केले जात आहे. कल्याणमध्ये रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. इस्लामपूर, सांगली, धाराशिव या ठिकाणी देखील गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सरकारलाच कायदा सुव्यवस्था बिघडायची आहे असे मराठ्यांनी समजायचे का?, हा माझा प्रश्न मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना आहे, असेही जरांगे यांच्याकडून सांगण्यात आले.

ओबीसी आणि मराठा बांधवात वाद होऊ नये, शांतता राहावी यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करत आहोत. दिवस पुरत नसल्याने रात्री लोकांच्या दारात जाऊ लागलो. याचा अर्थ तुम्हीच त्यांना (छगन भुजबळ आणि टीका करणाऱ्या ओबीसी नेते) पाठबळ देत आहात. जातीजातीमध्ये तेढ निर्माण करून सरकारलाच दंगली घडून आणायचे आहेत का? असा याचा अर्थ आहे का? पण तुम्ही त्यांच्यावर गुन्हे दाखल न करता, आमच्यावर गुन्हे दाखल केल्याने राज्यातील मराठा समाज घाबरणार नाही आणि खचणार देखील नाही, असे मनोज जरांगे पाटील हे आजच्या ठाण्यातील सभेत म्हणाले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -