अभिनेता पुष्कर जोगने सोशल मीडियावर मराठा मराठा सर्वेक्षणासाठी आलेल्या महिला कर्मचाऱ्यांनी जातीची विचारणा केल्यावरून एक वादग्रस्त पोस्ट लिहिली होती. ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. पालिका कर्मचाऱ्यांमध्येही संतापाची लाट उसळली आहे. या घटनेवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. सर्वेक्षणाला विरोध करणाऱ्या अभिनेत्यांकडे जाताच कशाला असा सवाल जरांगे पटील यांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना केला आहे.
त्यांच्याकडे जायलाय नाही पाहिजे. त्यांना विचारण्याची काही गरजच नाही. त्यांच्याकडे एवढे संस्कार आहे, असं पहिल्यापासून कोणाला वाटतच नाही. मागास सिद्ध करण्यासाठी कायद्याने एक समिती पाठवली. त्या समितीचा अवमान करणं योग्य नाही. पण माझं एकच म्हणणं आहे की त्यांच्याकडे जायचंच कशासाठी? त्यांना कसली कमतरता आहे, ते कसले मागास आहेत? सगळ्या दुनियेचा पैसा खातात ते, असं म्हणतं जरांगे पाटील यांनी संताप व्यक्त केला. अशा अभिनेत्यांकडून कशाला नैतिकता शिकावी, असाही सवाल जरांगे पाटील यांनी केला आहे.
अभिनेता पुष्कर जोगने मराठा आरक्षणाच्या सर्वेक्षणासाठी गेलेल्या महापालिकेच्या महिला कर्मचाऱ्याने जात विचारली म्हणून सोशल मीडियार एक पोस्ट शेअर करत संताप व्यक्त केला आहे. त्या पोस्टमध्ये त्यांनी लिहलं होत की, प्रश्न विचारणारी कर्मचारी महिला नसती तर दोन लाथा नक्कीच मारल्या असत्या. कृपा करून हा प्रश्न मला पुन्हा विचारू नका, नाहीतर जोग बोलणार नाहीत, डायरेक्ट कानाखाली मारतील. त्याच्या या पोस्टनंतर पालिका कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी जोगवर कारवाईची मागणी केली आहे.
या वादानंतर पुष्कर जोगने त्याच्या फेसबुक अकाऊंटवरून पोस्ट डिलीट केली आहे. त्यानंतर पुष्करने पुन्हा एकदा फेसबुक पोस्ट लिहती माफीदेखील मागितली आहे. या पोस्ट मध्ये त्यांनी लिहलं आहे की, मी रविवारी एक पोस्ट केली होती. ज्या पोस्टचा हेतू हा फक्त आणि फक्त हेच सांगण्याचा होता की मी केवळ माणुसकी हाच धर्म मानतो. अर्थात व्यक्त होताना बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल जे विधान माझ्याकडून गेलं त्यासाठी मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण ते कर्मचारी त्यांना दिलेलं काम करत होते. वैयक्तिक बीएमसी कर्मचाऱ्यांबद्दल माझ्या मनात आदराचीच भावना आहे. माझ्या विधानामुळे ते दुखावले गेले असतील तर पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो.