घरठाणेराज ठाकरेंच्या 'त्या' वक्तव्याला मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर, म्हणाले - "आमच्या मागे कोण...

राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्याला मनोज जरांगेंचे प्रत्युत्तर, म्हणाले – “आमच्या मागे कोण आहे? त्याला…”

Subscribe

मनोज जरांगे यांनी राज्य सरकारला ठाण्यातून इशारा देत ओबीसी प्रवर्गातून आरक्षणावर ठाम असल्याचे सांगितले आहे. यानंतर जरांगेंनी पुन्हा प्रसार माध्यमांशी संवाद साधत राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. 

ठाणे : मराठा समाजाचा आरक्षणाचा लढा आता तिव्र झाला आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे, अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून करण्यात आली आहे. यासाठी जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे आता या दरम्यानच्या कालावधीत मनोज जरांगे पाटील हे राज्यभरात दौरा करून मराठा समाजाची भेट घेणार आहेत. काल पुण्यातील खराडी येथे सभा झाल्यानंतर आज (ता. 21 नोव्हेंबर) जरांगेंची तोफ ठाण्यातील रंगायत नाट्यगृहात धडाडली. जरांगे यांचे ठाण्यात जंगी स्वागत करण्यात आले. मराठा समाजाने बाईक रॅली काढत जरांगेंवर फुलांची उधळण केली. यावेळी जरांगे यांनी राज्य सरकारला इशारा देत ओबीसी प्रवर्गातून आरक्षणावर ठाम असल्याचे सांगितले आहे. यानंतर जरांगेंनी पुन्हा प्रसार माध्यमांशी संवाद साधत राज ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे. (Manoj Jarange Patil response to Raj Thackeray’s ‘that’ statement)
मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कोण आहे, कालांतराने कळेलच, असे वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले होते. त्यामुळे जरांगेंच्या मागे नेमक कोण आहे? अशी चर्चा सध्या सर्वत्र रंगली आहे. परंतु, त्यांच्या या वक्तव्याला आता मनोज जरांगे यांनी उत्तर दिले आहे. याबाबत प्रसार माध्यमांनी जरांगे यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, “आमच्या मागे कोण आहे हे लवकरच शोधून सांगा. तुमच्या जास्त ओळखी आहेत. आमच्या कमी आहेत. लवकर शोधून आणा. आम्हाला फक्त त्यांचं नाव सांगा. आमच्या मागे कोण आहे? आम्हीच त्याला नीट करतो. आमच्या मागे एकच आहे आणि तो म्हणजे मराठा समाज. ते आम्हाला माहीत आहे.”
तसेच, एखाद्या माणसाला पढवले तर त्याला बोलता येत नाही. तो अडखळतो. तो जेवढे शिकवले तेवढेच बोलतो. आम्ही समाजाच्या मनातील वेदना मांडतो. आम्हाला कुणी शिकवण्याची गरज नाही. आमच्या वेदना आम्हाला माहीत आहेत. आमच्या आंदोलनात आमच्यावर अनेक आरोप झाले. काही लोकांनी तर आम्हाला सत्ताधाऱ्यांनीच आंदोलनाला बसवल्याचा आरोप केला. साधी गोष्ट आहे, कोणताही सत्ताधारी कधी आपल्याच विरोधात कुणाला आंदोलनाला बसवेल काय? आपल्याच सरकारविरोधात कोणी असंतोष निर्माण करेल काय? असा प्रश्न जरांगे याच्याकडून उपस्थित करण्यात आला.
छगन भुजबळ यांच्याकडून ज्याप्रमाणे टीका करण्यात येत आहे. त्यावरून त्यांच्या मागे कोणी आहे का? असा प्रश्न जरांगे यांना प्रसार माध्यमांकडून विचारण्यात आला. या प्रश्नाला जरांगे यांनी उत्तर देत म्हटले की, भुजबळांचा बोलविता धनी कोण असेल वाटत नाही. त्यांचे विचार तसेच आहेत. ते विदूषकासारखे बोलतात. एक शंका येते. इतके वक्तव्य करत असताना जातीत तेढ निर्माण होण्याचा विषय आला. त्यांना थांबवत नाही. ते सरकारमध्ये आहे. त्यामुळे त्यांच्या मागे कोणी तरी असेल ही शंका आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -