छत्रपती संभाजीनगर : आंतरवालीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर गोळीबार झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे मराठ्यांचे हिरो म्हणून समोर आले आहेत. पण इतर कोणत्याही फायद्यासाठी राजकीय आरक्षण मिळावे, हीच जरांगे यांची मनषा असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्याकडून करण्यात आला. त्यामुळे मराठा तरुणांनी नेमकी कोणाला साथ द्यावी आणि नाही, याचा विचार करावा, असे आवाहनही वडेट्टीवार यांनी केले आहे. मात्र, वडेट्टीवार यांच्या आरोपांना आणि त्यांनी मराठा समाजाच्या तरुणांना केलेल्या आवाहनाला आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले आहे. (Manoj Jarange Patil response to Vijay Wadettivar’s allegations)
हेही वाचा – मराठा समाजाच्या तरुणांना विजय वडेट्टीवारांचे आवाहन, म्हणाले…
विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर देताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, विरोधी पक्ष असा नसतो की जे समोरून म्हणतात, मराठ्यांना आरक्षण देऊ नका, त्यामुळे मराठा समाजाला विरोधी पक्षाने तरी सल्ला देऊ नये. तुमची विचारधारा ही मराठ्यांच्या विरोधात विष पेरणारी आहे. हे मराठ्यांना माहीत आहे. पण तुम्हीच बोलले होता की, मराठ्यांना ओबीसीत आरक्षण द्यावे, ज्यामुळे त्यांच्यासाठी मराठा समाजाने टाळ्या वाजवल्या होत्या. मराठा समाजाला तुम्हाला मानत होता. पण जेव्हापासून तुम्ही पुन्हा आगपाखड सुरू केली तेव्हापासून मराठ्यांना कळाले आहे की हे कोण राजकारणासाठी करतात आणि कोण नाही, असा टोला मनोज जरांगे पाटील यांनी लगावला आहे.
तसेच, मी हे राजकारणासाठी करत आहे, असे एकही मराठा किंवा ओबीसी म्हणू शकत नाही. तुम्ही सोडलात तर. तुमच्या मनात मराठ्यांविषयी माया नाही. केवळ द्वेष भरलेला आहे. मराठ्यांना सल्ले विजय वडेट्टीवारांनी तरी देऊ नये. तर मराठ्यांच्या पोरांनी अभ्यास करावा अथवा नाही, याचा विचार तुम्ही करून नका. अभ्यास करूनच मराठा समाजाच्या पोरांच्या बरगड्या मोडल्या आहेत. मराठ्यांच्या पोरांना माहीत आहे की तुम्ही किती मराठ्यांच्या पोरांना आरक्षण न मिळावे, यासाठी प्रयत्न करत आहात, असे प्रत्युत्तर मनोज जरांगे यांच्याकडून देण्यात आले आहे.
आम्ही हिरो नाही झालेलो. आम्ही स्वतःला हिरो सुद्धा मानत नाही. आम्हा मराठ्यांना तुम्ही विरोधकांनी सत्ताधाऱ्यांसोबत मिळून मोडायचे ठरवले होते. आमचे आंदोलनही मोडायचे ठरवले होते. परंतु, डोकी फुटलेली असताना आम्ही मराठ्यांच्या लेकरांसाठी लढायचे ठरवले. त्यामुळे संपूर्ण हयातीत तुम्ही मराठ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू शकत नाही. कारण तुम्हा पाच सहा राजकारण्यांना सर्वच समाजातील लोक ओळखून चुकले आहेत. तुमच्या पक्षाने मराठा समाजाचा स्वतःच्या राजकीय फायद्यासाठी किती वापर केला हे सर्वांना माहीत आहे, असा आरोपही जरांगे यांच्याकडून वडेट्टीवार यांच्यावर करण्यात आला आहे.