मुंबई : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणाचे राज्यभरात पडसाद उमटताना पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रात मराठा समाजात तीव्र संतापाची लाट उसळली असून राज्यभरात आंदोलन केले जात आहे. विविध भागांत सर्वपक्षीय मोर्चा काढले जात आहेत. आज (5 जानेवारी) पुण्यात सर्वपक्षीय मोर्चा काढण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मंत्री धनंजय मुंडे यांना इशारा दिला आहे. ‘धनंजय मुंडे शहाणा हो नाहीतर आम्ही आता थांबणार नाही’, असं म्हणत जरांगे पाटलांनी इशारा दिला आहे. (manoj jarange warning cm devendra fadnavis and dhananjay munde demanding justice for the murder of santosh deshmukh)
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा मिळावी यासाठी राज्यभर मराठा समाजाने मोर्चे काढण्याचा निर्णय घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी सत्ताधारी नेत्यांना कडव्या शब्दांत इशारा दिला आहे. मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त करत धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशारा दिला होता. त्यानुसार, “धनंजय मुंडे शहाणा हो, नाहीतर आम्ही आता थांबणार नाही. ज्या मराठ्यांनी तुला साथ दिली, त्यांच्यावरच पलटण्याचा प्रयत्न करू नकोस. मुंडे जर मराठा समाजावर आरोप करत असतील, तर आम्हीही त्याला प्रतिउत्तर देऊ. तुम्ही मोर्चे काढले, तर आम्हीही मोठ्या प्रमाणावर मोर्चे काढू. मुंडेंनी हे सगळं थांबवायला हवं. मी कधीच विरोधकांना विरोध केला नाही, पण जर मराठा समाजाच्या विरोधात कुणी बोलणार असेल, तर आम्हीही गप्प बसणार नाही.”, अशा शब्दांत मनोज जरांगे पाटलांनी मंत्री धनंजय मुंडेंना इशारा दिला आहे.
याशिवाय, “मुख्यमंत्र्यांनी आम्हाला दिलेला शब्द मराठा समाजाने मानला आहे. पण जर एकही आरोपी सुटला, तर मराठ्यांना धोका दिला असा संदेश जाईल. संतोष देशमुख यांचा खून आमच्या जिव्हारी लागला आहे. हा प्रकार जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. सरकारने यावर तातडीने कारवाई केली नाही, तर मराठा समाज राज्यभर उग्र आंदोलन करेल. संतोष देशमुख यांचे मारेकरी पुण्यात कसे सापडले? हे आरोपी बीडमधून थेट पुण्यात का आले? या प्रकरणाचा तपास योग्य प्रकारे होण्याची गरज आहे. दोषींना कठोर शिक्षा झालीच पाहिजे.”, असेही जरांगे यावेळी म्हणाले. तसेच, पुण्यात होणाऱ्या मोर्चात आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी प्रमुख मागणी केली जाणार आहे.
हेही वाचा – BJP : चीनमधील कम्युनिस्ट पक्षाला मागे टाकत भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष; मुख्यमंत्री फडवणीसांची माहिती