मुंबई : देवेंद्र फडणवीस हे माझ्याविरोधात षडयंत्र रचत आहेत. मला सलाईनमधून विष देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, असा गंभीर आरोप मराठ आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. एवढेच नाही तर मनोज जरांगे पाटील देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर येण्यासाठी निघाले आहेत. या प्रकरणी आता प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटले की, मनोज जरांगे पाटील यांचे आरोप बिनबुडाचे आहेत, पण सागर बंगला सरकारी आहे, त्यामुळे सरकारी कामासाठी कोणीही येऊ शकतं, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. (Manoj Jaranges allegations are baseless but anyone can come to Sagar Bungalow Devendra Fadnavis reaction)
हेही वाचा – NCP-SP : फडणवीसांची ताबडतोब चौकशी करावी; जरांगेंच्या आरोपानंतर शरद पवार गटाची मागणी
मनोज जरांगे सागर बंगल्याकडे निघाले आहेत, यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सागर बंगला हा सरकारी आहे. त्यामुळे कोणीही सरकारी कामाने सागर बंगल्यावर येऊ शकतं. कोणाचीही अडवणूक होणार नाही. मात्र, मनोज जरांगे कोणत्या निराशेतून बोलत आहेत, त्यांना कोणती सहानुभूती हवी आहे, हे माहीत नाही. ते जे बोलले ते बिनबुडाचे आणि धादांत खोटं आहे, हे त्यांना सुद्धा माहिती असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला.
हेही वाचा – Bacchu Kadu : एका व्यक्तीवरील आरोपाने आंदोलनाची दिशा…; बच्चू कडूंकडून जरांगेंना विनंती
मी मराठा समाजासाठी काय केलं? असा प्रश्न उपस्थित करत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सारथी आणि अण्णासाहेब पाटील मंडळाची सुरुवात केली. मराठा आरक्षण उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात टिकवलं. त्यामुळे कोणी आरोप करत तर त्यावर मराठा समाज विश्वास ठेवेल, असं मी मानत नाही. पण जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे आणि शरद पवार बोलत होते, तीच स्क्रिप्ट मनोज जरांगे का बोलत आहेत? असा प्रश्नही देवेंद्र फडणीवस यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच काही अंदाज आम्हालाही आहे. आम्ही योग्यवेळी सर्व बाहेर काढू. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन लागेल आणि ते सर्व करेल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिला.