Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रExit Poll : आरक्षणाचा विषय गंभीर, तरीही मराठा-ओबीसीचा महायुतीला पाठिंबा; आकडे काय...

Exit Poll : आरक्षणाचा विषय गंभीर, तरीही मराठा-ओबीसीचा महायुतीला पाठिंबा; आकडे काय सांगतात?

Subscribe

आरक्षणाच्या मागणीमुळे महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये फटका बसला होता. त्यामुळे विधानसभेतही आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे नुकसान होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता समोर आलेल्या एका एक्झिट पोलनुसार, मराठा आणि ओबीसी समाज महायुतीच्या पाठीशी असल्याचे समोर आले आहे.

मुंबई : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या तयारीत होते, मात्र ऐनवेळी त्यांनी माघार घेतली. तर दुसरीकडे ओबीसी समाजानेही आरक्षणाची मागणी लावून धरली आहे. याचा फटका महायुतीला लोकसभा निवडणुकीमध्ये बसला होता. त्यामुळे विधानसभेतही आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे नुकसान होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र आता समोर आलेल्या एका एक्झिट पोलनुसार, मराठा आणि ओबीसी समाज महायुतीच्या पाठीशी असल्याचे समोर आले आहे. (Maratha community supports Mahayuti in assembly elections)

मराठा आरक्षणासाठी आक्रमक असलेल्या मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी अनेकदा उपोषण केले. मात्र आरक्षण मिळत नसल्याने त्यांनी अखेर निवडणुकीमध्ये उतरण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्यांनी बैठकाही घेतल्या. त्यामुळे मनोज जरांगे स्वत: कुठे निवडणूक लढवणार किंवा मराठा समाजाचे किती लोक निवडणुकीच्या रिंगणात उतरणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र मनोज जरांगे यांनी ऐनवेळी निवडणुकीतून माघार घेतली. यानंतर शरद पवार यांनी म्हटले होते की, याचा फायदा आम्हाला होऊ शकतो, असे सूचक वक्तव्य केले होते. यानंतर आज मतदानाच्या दिवशी मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा मराठा समाजाला आवाहन केले.

- Advertisement -

मतदानाची प्रक्रिया सुरू असतानाच मनोज जरांगे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, योग्य माणूस निवडण्याची हीच संधी आहे. आपल्या लेकराच्या आणि आरक्षणाच्या बाजूने मतदान करा. मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्याला सोडू नका. तुमच्या मनाने तुम्हाला जे करायचे ते करा, कारण मालक तुम्ही आहेत. पण मी कोणाजवळ फोटो काढला, याचा अर्थ मी त्याला पाठिंबा दिलेला नाही. मी कुठे टीम पाठवली नाही, कुठे मेसेज किंवा संदेश पाठवलेला नाही. मी समाजाला कोणाच्याही दावणीला बांधले नाही, त्यामुळे तुम्हाला ज्याला वाटेल त्याला मतदाना करा, असे आवाहन मनोज जरांगेंनी केले होते. तर ओबीसी समाजाने निवडणुकी आधी महायुतीला पाठिंबा जाहीर केला होता. यानंतर आता मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत.

हेही वाचा – Exit Poll : राज्यात त्रिशंकू तर अपक्षांच्या पाठिंब्याने मुख्यमंत्री…; या एक्झिट पोलची चर्चा

- Advertisement -

मतदानानंतर आलेल्या एक्झिट पोलनुसार महायुतीला स्पष्ट बहुमत मिळण्याची शक्यता आहे. 10 पैकी 6 एक्झिट पोलने महायुतीच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे. त्यामुळे या निवडणुकीत मराठा आंदोलनाचा फॅक्टर प्रभावी ठरला नसल्याचे समोर आले आहे. आज आलेल्या ॲक्सिस माय इंडिया एग्जिट पोलनुसार 48 टक्के मराठा समाज महायुतीच्या पाठीशी असल्याचे समोर आले आहे. तर 40 टक्के मराठा समाजाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 64 टक्के ओबीसी समाजानेही महायुतीला पाठिंबा दिला आहे. तर 25 टक्के ओबीसी समाज महाविकास आघाडीच्या बाजूने आहे.

79 टक्के मुस्लीम समाजाचे मविआला समर्थन

दरम्यान, अनुसूचित जातीच्या 34 टक्के आणि अनुसूचित जमातीच्या 49 टक्के समाजाने महायुतीला पाठिंबा दिला आहे. तर अनुसूचित जातीच्या 40 आणि अनुसूचित जमातीच्या 37 टक्के समाजाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला आहे. तसेच 53 टक्के कुणबी समाजाचा महायुतीच्या पाठिंबा आहे, तर 34 टक्के कुणबी समाजाचे महाविकास आघाडीला समर्थन आहे. महत्त्वाची बाब म्हणजे 79 टक्के मुस्लीम समाजाने महाविकास आघाडीला समर्थन दिले आहे, तर फक्त 4 टक्के मुस्लीम समाजाचा महायुतीला पाठिंबा आहे.

हेही वाचा – Election 2024 : मुंबई शहरात सरासरी 52.69 टक्के मतदान; 25 पैकी 13 लाख मतदारांनी केले मतदान


Edited By Rohit Patil

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -