छत्रपतींच्या गादीचा अवमान करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला?, पुण्यात मराठा समाज आक्रमक

वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजांची बदनामी केल्याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात हजर राहण्यासाठी पोलीसांनी त्यांना नोटीस बजावली होती. त्यानुसार सदावर्ते पोलीस ठाण्यात हजर झाले आहेत. यावेळी मराठा आंदोलक चांगलेच आक्रमक झाले आहेत.

गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाच्या आदेशानुसार, पोलिसांत हजेरी लावणे बंधनकारक आहे. त्याप्रमाणे कालही ते भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. आपली मुस्कटदाबी सरकार करत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला होता. त्यामुळे पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावण्यासाठी आले असता मराठा आंदोलक आक्रमक झालेले पहायला मिळाले.

मराठा समाजातील आंदोलकांनी गुणरत्न सदावर्तेंविरोधात भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनबाहेर घोषणाबाजी केली. जातीजातीत तेढ निर्माण केली असून मराठा आरक्षणाविरोधात ते काम करत आहेत. छत्रपतींच्या वंशजांचा आणि छत्रपतींच्या गादीचा अवमान करण्याचा अधिकार त्यांना कोणी दिला?, एवढे असूनही सदावर्ते उजळ माथ्याने येथे येतात. त्यांना महाराष्ट्रात फिरू देता कामा नये, असा संताप आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

नक्की काय आहे वाद?

मराठा आरक्षणाच्या मुद्यावर बोलताना सदावर्तेंनी एका वृत्तवाहिनीवर खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केलं होतं. सदावर्तेंचे वक्तव्य अत्यंत निंदनीय असल्याचे सांगत सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने यावेळी निषेध करण्यात आला होता. मात्र, सदावर्तेंनी केलेल्या आक्षेपार्ह विधानाबाबत सकल मराठा समाज आणि करण गायकर यांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली होती. तर राज्यात विविध ठिकाणी त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.


हेही वाचा : सध्या पक्ष स्थापना नाही, आधी जनतेचे प्रश्न समजून घेणार – रणनीतीकार प्रशांत किशोर