घरमहाराष्ट्रमराठा आरक्षणासाठी आमदारांचं 'राजीनामा'स्त्र!

मराठा आरक्षणासाठी आमदारांचं ‘राजीनामा’स्त्र!

Subscribe

मराठा समाजाचे आंदोलन पेटले असताना मराठा आमदारांनी राजीनामा देण्यास सुरुवात केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी हे राजीनामे दिले जात आहे. कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांनी नुकताच हा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. आमदार हर्षवर्धन जाधव आणि भाऊसाहेब पाटील यांनी याअगोदरच राजीनामा दिला आहे. त्यामुळे आरक्षणासाठी आता तीन मराठा आमदारांनी राजीनामा दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी राज्यातील तीन मराठा आमदारांनी राजीनामे दिले आहेत. कॉंग्रेसचे आमदार भारत भालके यांनी नुकताच हा राजीनामा दिल्याचे समोर आले आहे. भारत भालके हे पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाचे आमदार होते. मराठा समाजाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर मराठा आमदारांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी बुधवारी हर्षवर्धन जाधव आणि भाऊसाहेब पाटील चिकटगावरकर या दोन आमदारांनी राजीनामे दिले होते. दरम्यान या राजीनामासत्रात नाशिक जिल्ह्याचे चांदवड विधानसभा मतदार संघाचे भाजप आमदार डॉ. राहूल आहेर यांनी देखील सहभाग घेतला आहे. त्यांनी मराठा क्रांती मोर्चाच्या जिल्हा समन्वयकांना आपल्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे पत्र दिले. परंतु, त्यांनी अजून विधानसभा अध्यक्षांना राजीनामा दिलेला नाही. डॉ. राहुल आहेर यांनी मराठा क्रांती मोर्चा समन्वयकांना पाठिंबा देत असल्याचे सांगत हाच आपला राजीनामा असल्याचे म्हटले आहे.

भारत भालकेंना पदावर राहण्यात नैतिकता वाटत नाही

भारत भालके यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांना दिलेल्या राजीनाम्यात म्हटले आहे की, ‘मराठा समाजाच्या आंदोलनाचा वणवा पेटला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता होताना दिसत नाही. तीन वर्षांत शाहू, फुले, आंबेडकरांच्या या राज्यात अस्थिरता निर्माण झाली आहे’. अशा परिस्थितीत आपण पदावर राहणे नैतिकतेचे वाटत नसल्याचे भालकेंनी म्हटले आहे. त्याचबरोबर मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. पंढरपूरमध्ये मराठा आंदोलकांची जेव्हा धरपकड केली जात होती, तेव्हा भालकेंनी ‘अगोदर मला अटक करा मग आंदोलकांना’ असे आवाहन सरकारला केले होते.

- Advertisement -
resignation letter of mla bharat bhalke
भारत भालके यांचं राजीनामा पत्र

हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा

बुधवारी कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरु असलेल्या मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनात सहभाग घेतला. त्याचबरोबर त्यांनी ‘राज्य सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात बुधवारी चार वाजेपर्यत अध्यादेश काढावा’ अशी मागणी केली होती. परंतु, राज्य सरकारने मराठा आरक्षणासंबंधित कुठल्याही प्रकारचे अध्यादेश न काढल्यामुळे हर्षवर्धन यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे ईमेलमार्फत राजीनामा पाठवला.

resignation letter of mla harshavardhan jadhav
आमदार हर्षवर्धन जाधव यांचा राजीनामा

वैजापूरचे भाऊसाहेब पाटील यांनीही दिला राजीनामा

याअगोदर वैजापूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर यांनी देखील राजीनामा दिला होता. ‘५८ मूकमोर्चे काढूनही सरकार आरक्षणाच्या मागणीकडे गांभीर्याने बघत नाही आणि त्यामुळे काकासाहेब शिंदे सारख्या तरुण मुलाने आत्महत्या केली’ असे सांगत भाऊसाहेब पाटील यांनी राजीनामा दिला.

- Advertisement -

लोकांच्या सहानुभूतीसाठी राजीनामा

या तीन आमदारांपैकी दोन आमदार हे औरंगाबाद जिल्ह्याचे आहेत. त्यात वैजापूरचे भाऊसाहेब पाटील आणि कन्नडचे हर्षवर्धन जाधव यांचा समावेश आहे. राज्यभरातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेने औरंगाबादमध्ये जास्त वातावरण तापलेले बघायला मिळत आहे. मराठा आरक्षणासाठी बीडच्या परळीमध्ये ठिय्या आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर लगेच औरंगाबादमधील मराठा समाजाच्या तरुण वर्गाकडून आंदोलन करण्यात आले. मांगण्यांची पूर्तता न झाल्यामुळे शांत आंदोलनाला हिंसक वळण लागले. त्यानंतर संपूर्ण राज्यात याचे पडसाद पडले. विशेष म्हणजे मराठा समाजाचा पहिला मूकमोर्चा देखील औरंगाबाद येथून निघाला होता. दरम्यान, हिंसक झालेल्या या आंदोलनात लोकांची सहानुभूती मिळावी यासाठी भाऊसाहेब पाटील आणि हर्षवर्धन जाधव यांनी राजीनामा दिला असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -