जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. शनिवार 10 फेब्रुवारीपासून त्यांचे हे उपोषण सुरू झाले असून त्यांच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे. गेल्या तीन दिवसांत जरांगे पाटलांनी पाण्याचा थेंबही घेतलेला नाही. ज्यामुळे त्यांची प्रकृती आता खालावू लागली आहे. परंतु, तरी देखील जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. ज्यामुळे आता जरांगेंच्या या भूमिकेमुळे सरकारची अडचण वाढली आहे. (Maratha Reservation : 3rd day of Manoj Jarange hunger strike, medical treatment is refused even though his health deteriorates)
हेही वाचा… Sanjay Raut : मुख्यमंत्र्यांची दाढी दिल्लीच्या हातात, राऊतांचा शिंदेंसोबत भाजपावरही निशाणा
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आरक्षणासाठी चौथ्यांदा उपोषणाला बसले आहेत. मागील महिन्यात त्यांचा मोर्चा हा अंतरवाली सराटीपासून पायी सुरू होऊन नवी मुंबईत दाखल झाला होता. मुंबईत धडक देणाऱ्या या मोर्चाला राज्य सरकारने वाशीतच थोपवून धरले होते. त्यावेळी सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सगेसोयरेबाबत अध्यादेश काढला होता. सोबतच पंधरा दिवसांमध्ये या अध्यादेशाची अंमलबजावणी होण्याचे देखील आश्वासन देण्यात आले होते. मात्र, पंधरा दिवस उलटून गेल्यावर देखील या अध्यादेशाची अंमलबजावणी होत नसल्याचा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. त्यामुळे त्यांनी आता पुन्हा एकदा उपोषण बसण्याचा निर्णय घेतला आहे.
10 फेब्रुवारीला मनोज जरांगे पाटील यांनी सकाळी 10 वाजल्यापासून उपोषणाला सुरुवात केली. या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून काल रविवारपासूनच त्यांची प्रकृती खालावू लागली आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने त्यांच्यावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे पथक रविवारी आंदोलनास्थळी दाखल झाले. मात्र, जरांगे यांनी उपचार घेण्यास स्पष्टपणे नकार दिला आहे. तर, जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केल्याने अंतरवाली सराटीमध्ये पुन्हा एकदा गर्दी होतांना पाहायला मिळत आहे. जालना जिल्ह्यासह मराठवाड्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील मराठा आंदोलक जरांगे यांची भेट घेण्यासाठी येत आहे. परंतु, कालपासून त्यांची प्रकृती खालावल्याने ते कोणासोबत ही बोलत नसल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
सरकारकडून अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यासाठी कोणत्याही हालचाली होत नसल्याने मनोज जरांगेंनी हा निर्णय घेतला आहे. तर जरांगेंना उपोषणाच्या काही दिवस आधीच उपोषणाला बसणार असल्याची घोषणा केली होती. तरीही सरकारकडून याबाबत जरांगेंची कोणतीही विचारपूस करण्यात आली नाही. त्यामुळे राज्य सरकारच्या या कारभाराबद्दल मनो जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली होती. विशेष म्हणजे आज सरकारकडून जरांगे यांच्यासोबत चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून कोणता निर्णय घेण्यात येतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.