जालना – महाराष्ट्र विधानसभेत महायुतीला बहुमत मिळाले आहे. लवकरच महायुतीचे सरकार स्थापन होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे 132 उमेदवार निवडून आले तर शिंदेंच्या शिवसेनेचे 57, अजित दादांच्या उमेदवारांचा 41 जागांवर विजय झाला आहे. महायुतीला 230 जागा मिळाल्या आहेत. भाजपच्या सर्वाधिक जागा आल्यामुळे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असे मानले जात आहे. दुसरीकडे मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी निवडणूक निकालावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले आधी दिडशे होते, मराठ्यांनी 204 आणले. सरकार स्थापन झाले की, आम्ही आमच्या आंदोलनाची तारीख जाहीर करणार आहोत. आरक्षण दिलं नाही तर सोडणार नाही. तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे.
मनोज जरांगे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला यावेळी त्यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यावर निशाणा साधला. लक्ष्मण हाके यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की, “तुला जरांगे आणि मराठा फॅक्टर कळायला हयात जाईल. आयुष्य गेलं तरी हे जरांगे काय रसायन आहे हे कळणार नाही. मर्दासारखं बोलायचं, आपण ज्याच्या सभा घेतल्या तो निवडून आला पाहिजे. मराठ्यांचे दीडशे होते, आता 204 झालेत. मराठ्यांशिवाय पान हालू शकत नाही.” हाके यांचे नाव न घेता ते म्हणाले, की “काहींना कुत्र्याचं कातडं पांघरून वाघ झाल्यासारखं वाटतं. मी मराठा बंधनमुक्त केला होता. राजकारणाच्या दहशतीपासून मी मराठा समाजमुक्त केला.”
मराठा समाज भाजपकडे वळला का?
मराठा समाज भाजपकडे वळला का, या प्रश्नावर ते म्हणाले, की मी समाजाला सांगितलं होतं, ज्याला निवडून आणायचं त्याला आणा, ज्याला पाडायचं त्याला पाडा. एका जातीवर उमेदवार उभे करून मला माझी जात संपवायची नव्हती. गोड बोलून मराठ्यांचं मतदान घेतला असेल. माज मस्ती आली, मराठ्यांशी बेईमानी केली तर पुन्हा आमरण उपोषण होणार आहे, असा इशारा त्यांनी महायुती सरकारला दिला आहे.
हेही वाचा : Rashmi Shukla : देवेंद्र फडणवीसांसह रश्मी शुक्लांचे कमबॅक होणार? निकालानंतर घेतली गृहमंत्र्यांची भेट
Edited by – Unmesh Khandale