अंतरवाला सराटी (जालना) – महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार यावरुन 2019 प्रमाणेच 2024 मध्ये पेच निर्माण झाला. भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक 132 जागांवर विजय मिळाला आहे, तर महायुतीला 230 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. असे असतानाही महाराष्ट्रात सत्तास्थापनेचा दावा महायुतीकडून चार दिवसानंतरही करण्यात आलेला नाही. निकाल लागून आज चार दिवस होत आहेत. मात्र महायुतीमध्ये मुख्यमंत्री पदावर कोण विराजमान होणार, यावरुन एकमत होत नाही, त्यामुळे सत्तास्थापनेला उशिर होत होता. राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी पत्रकार परिषद बोलावली. तातडीच्या या पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी भाजपचे केंद्रीय नेतृत्व अर्थात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा जो काही निर्णय घेतील तो मान्य असेल, असे म्हटले आहे. त्यामुळे आता सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा झाल्याचे मानले जात आहे. भाजपचा मुख्यमंत्री होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
कोणीही मुख्यमंत्री झाले तरी सुट्टी नाही, जरांगेंचा इशारा
एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा दावा सोडला हा त्यांचा राजकीय विषय आहे, त्याच्यावर आम्ही बोलणे योग्य नाही, आम्ही आमच्याच कामात आहोत, येत्या रविवारी आम्ही तुळजापूर दर्शनासाठी जात आहोत. मुख्यमंत्री कोणीही होवो, आम्हाला त्याच्याशी काही देणे घेणे नाही, परंतु मराठ्यांची एकजूट सरकारचा घाम फोडणारी आहे, कोणीही आले तरी आम्हाला सुख नव्हते, आम्हाला संघर्ष करावाच लागणार आहे. कोणीही मुख्यमंत्री झाले तरी आरक्षण घेणार, सुट्टी नाही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
आजकालचे सरकार भावनाशून्य
जरांगे म्हणाले की, सरकारने मराठा समाजाच्या पाठीशी उभे राहून त्यांना आरक्षण मिळवून द्यावे, मस्तीत येऊ नये. आजकालचे सरकार भावनाशून्य आहे, त्यांना भावनेची किंमत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आरक्षण बाबतीत काम केले आहे, पण आम्हाला पण लढावे लागले होते, असेही जरांगे म्हणाले.
मराठा समाजाला महाविकास आघडी आणि महायुतीकडून सहजा सहजी काहीही मिळालेले नाही. मुख्यमंत्री हे आरक्षणाबाबत काम करू शकले, आरक्षण मिळवून देऊ लागले, पण सत्य हे पण आहे आम्हाला सहजा सहजी मिळाले नाही. आम्ही आमच्या आमरण उपोषणाच्या तयारीला लागलो आहोत. 132 पेक्षा जास्त मतदार संघात 20 हजाराच्या आसपास महायुतीचे उमेदवार निवडून आलेले आहेत, तिथे मराठ्यांनी सभा लावली असती तर पूर्ण राख झाली असती, असंही मनोज जरांगे म्हणाले.
Edited by – Unmesh Khandale