बीड – मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसण्याचा निर्णय घेतला आहे. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीत सामूहिक आमरण उपोषण करण्याचा निर्णय जरांगे यांनी घेतला आहे. याची माहिती त्यांनी बीडमध्ये दिली.
मनोज जरांगे म्हणाले की, निवडणूक झाली आहे. तो विषय संपला आहे. मराठ्यांनी आता तो विषय डोक्यातून काढून टाका. तुमचं, तुमच्या जातीचं काय, तुमचं अस्तित्व, तुमच्या लेकराचं भवितव्य काय, त्यामुळे आता आरक्षणाचं बघं. मराठ्यांनी आपल्या लेकरांचं भविष्याचं बघा. त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण मराठ्यांनी आता अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाच्या तयारीला लागा, असं आवाहन मनोज जरांगे यांनी केले.
मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा मुहूर्तही ठऱला आहे. ते म्हणाले की, सरकार स्थापन झाल्यानंतर सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर केली जाईल. त्या दिवशी अंतरवाली सराटीकडे या, असं आवाहन जरांगे यांनी केले. ते म्हणाले की, जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत उपोषण सुरु राहाणार असा निर्धारही जरांगे यांनी व्यक्त केला आहे.
महाराष्ट्रात मुख्यमंत्री कोण होणार यावरुन महायुतीचा पेच फसला आहे. त्यावर मनोज जरांगे म्हणाले की आता सामूहिक आमरण उपोषण करायचे आहे. एकाच दिवशी एकाच वेळी अंतरवाली सराटीमध्ये सामूहिक आमरण उपोषण होणार आहे. मी समाजाला सांगितलं होतं, तुम्हाला ज्याला पाडायचं त्याला पाडा आणि ज्याला निवडून आणायचं त्याला निवडून आणा. मी माझ्या भूमिकेपासून बदललो नाही म्हणून माझा समाज आज माझ्या पाठीमागे आहे. आता कोणीही आलं तरी आम्हाला काही फरक पडणार नाही. कोणीही आलं तरी समाजासाठी लढावं लागणार आहे. कोणीही येऊद्या तीच सासू आहे. आम्ही वटणीवर आणू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला.
दादागिरी करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला त्याचा खूप वाईट परिणाम भोगावा लागेल, मराठ्यांच्या नादी लागू नका. असेही जरांगे म्हणाले.
महाराष्ट्रात डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सरकार स्थापन होण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुन्हा एकदा मनोज जरांगेंचे उपोषण सुरु होणार आहे.
Edited by – Unmesh Khandale