अंतरवाली सराटी (जालना) – मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आजपासून अंतरवाली सराटी येथे उपोषणाला सुरुवात केली आहे. मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यात यावे या जुन्याच मागण्यांसाठी त्यांनी आजपासून उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यासोबतच बीड येथील सरपंच दिंवगत संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा दिली पाहिजे या नवीन मागणीचाही त्यांच्या आंदोलनात समावेश करण्यात आला आहे. अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांच्यासोबत मराठा समाजानेही सामूहिक उपोषण सुरु केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्हाला विश्वास आहे. ते आमच्या मागण्या मान्य करतील. आता त्यांनी दाखवून द्यायचे आहे की त्यांच्या मनात मराठा समाजाविषयी प्रेम आहे की राग, असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला.
तू पुन्हा आला की मी पुन्हा बसणार…
तू पुन्हा आला की, मी पुन्हा बसणार, असा इशारा मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणुकीत देवेंद्र फडणवीस यांना दिलेला होता. त्यांनी त्यांचे हे वाक्य आज प्रत्यक्षात आणले आहे. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस हे सांगत होते की, आम्ही मराठा समाजाच्या मागण्यांच्या आड येत नाही. आमची कोणतीही आडकाठी नाही. असे सांगत मनोज जरांगे म्हणाले की, विधानसभेत मराठा बांधवांनी यांना मतदान केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यावर आम्ही विश्वास दाखवला आहे. आता त्यांची जबाबदारी आहे की, त्यांच्या मनात मराठा समाजाविषयी प्रेम आहे की राग हे आता दिसून येईल. आताच मी काही बोलणार नाही, मात्र फडणवीस आता मुख्यमंत्री आहेत त्यांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या, अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे
मराठा आरक्षण आंदोलनाच्या प्रमुख आठ ते दहा मागण्या आहेत. या मागण्यांची तातडीने अंमलबजवाणी करा अशी मागणी मनोज जरांगे यांनी आज उपोषणाला सुरुवात करताना केली आहे. ते म्हणाले की, मराठा आरक्षणासोबतच
संतोष देशमुख हत्याकांडातील सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी अंतरवाली सराटीमध्ये सामूहिक उपोषण सुरु करण्यात आले आहे. काही ठिकाणी कुणबी नोंदी होऊन देखली प्रमाणपत्र दिले नाही, असा आरोपही जरांगे पाटील यांनी सरकारवर केला.
मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या
- मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या.
- सगेसोयरे अध्यादेशाची तत्काळ अमंलबजावणी करा.
- हैदराबाद गॅझेट, मुंबई गॅझेट, सातारा गॅझेट लागू करा.
- शिंदे समितीला मुदतवाढ दिली पाहिजे, कुणबी नोंदी पुन्हा सुरु करा.
- मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेतले पाहिजे.
- बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे.
- संतोष देशमुख यांच्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे.