अंतरवाली सराटी (जालना) – मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीमध्ये उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांनी उपोषण थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा आरक्षणाचा खरा मारेकरी कोण हे आता समोर आलं आहे, मराठा समाजाचे डोळे उघडले आहेत, असं म्हणत मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. यापुढे शक्यतो आरक्षणाच्या लढाईसाठी उपोषण करणे बंद करणार असल्याची मोठी घोषणा त्यांनी केली. मनोज जरांगे यांनी अंतरवाली येथे 25 जानेवारीपासून सामूहिक उपोषण सुरु केले होते. सर्व उपोषणकर्त्यांशी चर्चा करून आंदोलनासंबंधी पुढील निर्णय घेण्यात येईल असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं.
सरसकट ओबीसीमधून आरक्षणाची मागणी
मराठा समाजाला ओबीसीमधून कुणबी जात प्रमाणपत्र देऊन सरसकट आरक्षण द्यावे, या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी 25 जानेवारीपासून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु केले होते. आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे. मात्र गेल्या पाच दिवसांमध्ये शासन स्तरावरुन जरांगेंच्या उपोषणाकडे सपशेल दुर्लक्ष करण्यात आले. सरकार पातळीवरुन कोणीही उपोषणाची दखल घेतलेली दिसून आले नाही.
आज अंतरवाली सराटीच्या वेशीवर वडीगोद्री येथे काही महिलांनी रास्तारोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पोलिसांनी सुरक्षित बाजूला केले. काल दुपारी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. संतोष देशमुख यांच्या आई शारदाबाई यांच्या विनंतीवरुन मनोज जरांगे पाणी प्याले होते. आमदार सुरेश धस यांनीही काल रात्री त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर त्यांनी सालाईन देखील लावले होते.
देवेंद्र फडणवीसांवर जरांगेंचा निशाणा
मनोज जरांगे यांनी आज संध्याकाळी पत्रकार परिषदेत यापुढील आंदोलनाचे संकेत दिले आहेत. ते म्हणाले की, उद्या दुपारी 12 वाजतापर्यंत उपोषण सोडण्याबद्दल निर्णय घेतला जाईल. या पुढील आंदोलन हे उपोषणाचे नसेल तर ते आता झकपक आंदोलन असेल. उपोषण सोडण्याचा निर्णय मराठा समाजासोबत बोलून घेतला जाईल असेही त्यांनी सांगितले.
जरांगे यांनी उपोषण सोडण्याचा निर्णय जवळपास निश्चित केला आहे. उद्या दुपारी ते उपोषण सोडणार आहेत असेच म्हटले जात आहे. मराठा आरक्षणासोबतच मनोज जरांगे यांनी संतोष देशमुख हत्याकांडाचा तपास आणि आरोपींना फाशीची शिक्षा यासाठीही उपोषण असल्याचे म्हटले होते. त्यामुळे उपोषण सोडण्याची भाषा करत असताना त्यांनी संतोष देशमुखांचे प्रकरण मागे पडू देणार नाही असे म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी निशाणा साधला. मनोज जरांगे म्हणाले की, “आमचे डोळे उघडले आणि मराठा समाजाचे डोळे उघडले आहेत. आरक्षणाचा खरा मारेकरी कोण हे सर्वांना माहित झालं आहे. देवेंद्र फडणवीस जाणून बुजून काम करत नाही, हे मराठा समाजाला कळलं आहे.”