घरमहाराष्ट्रपुण्यातल्या आंदोलनाचा रोष पोलिसांवर

पुण्यातल्या आंदोलनाचा रोष पोलिसांवर

Subscribe

पुणे पोलीस दलात कार्यरत असणारे उपविभागीय पोलीस राम पाठारे यांच्या नोकरीचा काल शेवटचा दिवस होता. पण मराठा मोर्चा आंदोलनादरम्यान सेवा बजावत असताना ते जखमी झाले.

सकल मराठा समाजातर्फे राज्यभर आरक्षणासाठी आंदोलने सुरु आहेत. या आंदोलनाला ठिकठिकाणी हिंसक वळण लागल्याचे पहायला मिळाले. पुण्यातल्या चाकण आणि राजगुरुनगर येथे सुरु असलेल्या आंदोलनादरम्यान गाड्यांच्या झालेल्या नुकसानाबरोबरच पोलिसांनाही आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. पोलीस दलात कार्यरत असणारे उपविभागीय अधिकारी राम पाठारे हे नोकरीच्या शेवटच्या दिवशी जखमी झाले आहेत.

आंदोलनादरम्यान राम पाठारे यांच्यासह सहा पोलीस अधिकारी जखमी झाले असून जवळपास पोलिसांच्या ५ गाड्या जळून खाक झाल्या आहेत. चाकणमध्ये सुरु असलेले हिंसक आंदोलन पोलिसांसाठी आव्हानात्मक ठरले. सुरवातीला बंदोबस्त कमी असल्याने पोलिसांची तारांबळ उडाली होती. थेट पोलीस ठाण्यावर जमाव चालून गेला होता. आंदोलक टोळक्या टोळक्याने गाड्यांना आग लावत होते, याच वेळी बंदोबस्तावर असलेले पोलीस आधिकारी राम पठारे यांच्या गाडीला आंदोलकांनी लक्ष्य करुन काही क्षणात गाडी जाळली. त्यानंतर हा जमाव काठ्या, गज, तलवार घेऊन पोलीस ठाण्यावर चालून गेला. जमावाने पोलीस ठाण्यावर जोरदार दगडफेक केली. भयभीत पोलीस आतमध्ये दरवाजा लावून बसले होते. त्यांच्या दरवाजावर आंदोलकांनी लाथा मारायला सुरुवात केली.

- Advertisement -

पोलिसांचा संघर्ष नित्याचाच

महाराष्ट्रात आपल्या हक्काच्या लढाईसाठी अनेक आंदोलने होत असतात या आंदोलनांना हिंसक वळण लागू नये, नागरिकांनी कायदा हातात न घेता आंदोलने करावी, यासाठी पोलीस दिवसरात्र आपल्या सेवेसाठी सज्ज असतो. पोलीसांची भावना प्रामाणिक असते, मात्र आंदोलकांना ती वाकडी दिसते. त्यात तेढ निर्माण होऊन आंदोलक विरुद्ध पोलीस असा संघर्ष निर्माण होतो. मात्र सर्व सहन करत पोलीस कर्मचारी प्रत्येक संकटाचा सामना करत असतात.

इतर पोलिसही जखमी

पोलीस उपअधीक्षक गणपतराव माडगूळकर, पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे, हवालदार अजय भापकर हे सुद्धा आंदोलना दरम्यान जखमी झाले. पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

- Advertisement -

महामार्गावरील प्रवाशांत भिती कायम

मराठा मोर्चाच्या आंदोलनाला हिंसक वळण लागेल याची कुणाला कल्पना नव्हती. अचानक झालेल्या हिंसक वळणाची आग नेहमीप्रमाणे एसटीला बसली त्यानंतर आंदोलकांनी पोलीसांना लक्ष्य केले. अखेर सायंकाळच्या सुमारास परिस्थिती नियंत्रणात आली आणि पुणे-नाशिक महामार्ग सुरळित सुरु झाला. पण पुणे आणि नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांसह, विद्यार्थी, कामगार, महिलांना आंदोलनाचा तडाखा बसला. जमावाच्या हिंसक कृत्याची भीती मात्र घरी जाताना सर्वांच्याच मनात होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -