घरमहाराष्ट्रMaratha Reservation: अजित पवारांच्या भेटीनंतर छत्रपती शाहू महाराजांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...

Maratha Reservation: अजित पवारांच्या भेटीनंतर छत्रपती शाहू महाराजांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

Subscribe

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. संयमाची भूमिका घेणारे खासदार संभाजीराजे देखील आता आक्रमक झाले आहेत. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची न्यू पॅलेस इथे भेट घेतली. अजित पवार आणि छत्रपती शाहू महाराज यांच्यात जवळपास एक तास बैठक सुरु होती. बैठकीनंतर छत्रपती शाहू महाराज यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मराठा आरक्षणासंदर्भात मोठं विधान केलं आहे. ठाकरे सरकार हे मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचं छत्रपती शाहू महाराज म्हणाले.

अजित पवार यांच्यासोबत झालेल्या भेटीत सर्व गोष्टींवर चर्चा झाली. यासंदर्भात सविस्तर माहिती अजित पवार देतील असं शाहू महाराजांनी सांगितलं. तसंच समाजासाठी जे काही चांगलं करता येईल ते करा, असं मार्गदर्शन देखील केलं आहे, असं देखील त्यांनी सांगितलं. शाहू महाराजांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिला असून त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तो निकाल समजून घेऊन जे शक्य आहे ते सर्व केलं पाहिजे, असं म्हटलं.

- Advertisement -

आंदोलनाबाबत आमच्यात कोणती चर्चा नाही

मराठा आरक्षणाच्या इतर मागण्यांकडे सरकारचं लक्ष असून यापुढेही राहणार आहे. आंदोलनाबाबत आमच्यात कोणती चर्चा झालेली नाही, असं छत्रपती शाहू महाराजांनी सांगितलं. पुढे बोलताना त्यांनी “मराठा समाजाने आता स्वत: सक्षम होऊन आपल्या पायावर उभं राहणं गरजेचं आहे,” असं मत व्यक्त केलं. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा ज्यांनी अभ्यास केला नाही त्यांनी तो करणं गरजेचा आहे. त्याचं मराठीत भाषांतर करुन समजून घेतला पाहिजे. तसंच न्यायालयाचा अवमान होता कामा नये, असं छत्रपती शाहू महाराज म्हणाले.

१६ जूनपासून कोल्हापुरातून मराठा आंदोलनाची सुरुवात

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलनाची हाक दिली आहे. ६ जून रोजी रायगडवरील शिवराज्याभिषेक सोहळा संपन्न झाल्यावर संभाजीराजेंनी मराठा आरक्षणावर आपली भूमिका मांडली. येत्या १६ जूनपासून कोल्हापुरातील राजर्षि शाहू महाराजांच्या समाधीपासून मराठा आरक्षण आंदोलनाला सुरुवात होईल असं संभाजीराजे म्हणाले.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -