जालना जिल्ह्यात मराठा आरक्षणावरून आंदोलन करणाऱ्यांवर लाठीमार झाल्यानं सध्या राज्यात तणावाचं वातावरण आहे. राज्यात ठिकठिकाणी मोर्चे काढले जात आहेत. यानंतर सरकार अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. सरकारचं एक शिष्टमंडळ मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीला गेलं आहे. यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता यावरून आमदार कपिल पाटील यांनी सरकारला पत्र लिहून आरक्षणाबाबत सर्व पक्षांची तातडीनं बैठक बोलावण्याची मागणी केली आहे. (Maratha Reservation Call a meeting of all party leaders regarding reservation for Maratha community Kapil Patil s letter to Government)
कपिल पाटील यांचं पत्र जसंच्या तसं
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील (अंतरवाली सराटी) येथे मनोज जरांगे पाटील यांचे सुरु असलेले आमरण उपोषण आणि निरपराध स्त्री, पुरुष आंदोलकांवर झालेला नाहक लाठीहल्ला यामुळे महाराष्ट्रभर चिंतेचे, तणावाचे वातावरण आहे.
गेली दशकभर हा प्रश्न चिघळत राहिला आहे. मात्र यावर योग्य तोडगा न काढल्यामुळे मराठा व मराठा कुणबी समाजाचा भ्रमनिरास झाला आहे. उद्ध्वस्त शेती, संपलेल्या नोकऱ्या, अपुरं शिक्षण यामुळे मागे पडलेल्या शेतकरी समाजाला न्याय देण्यासाठी आजवर झालेले प्रयत्न हे अपुरे आहेत हे लक्षात घेऊन तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे.
छत्रपतींच्या पोवाड्यात महात्मा फुले यांनी ज्यांचे कुलवाडीकुलभूषण म्हणून छत्रपती शिवरायांना गौरवलं तोच हा समाज आहे. ‘बरे झाले देवा कुणबी केलो’, या शब्दात संत तुकाराम महाराज यांनी दाखला दिला तोच हा समाज.
मराठा समाजाला नव्याने आरक्षण देण्याचा मुद्दा नाही. छत्रपती शाहू महाराजांनी मराठ्यांसह ज्यांना सर्वप्रथम आरक्षण दिलं ते पुनर्स्थापित करण्याची आवश्यकता आहे.
मी स्वतः विधान परिषदेत 18 एप्रिल 2013 रोजी मराठा आरक्षणावरील चर्चेत तामिळनाडूच्या धर्तीवर मराठा आरक्षणाचा निर्णय घ्या, ही मागणी केली होती. पण तत्कालीन सरकारने त्याकडे दुर्लक्ष केलं आणि घटनात्मक आधार नसलेली राणे समिती नेमली. त्यातून मराठा आरक्षणाचा प्रश्न भिजत पडला. नवं सरकार ती हिंमत दाखवेल काय?
माझी आपणास विनंती आहे की, सर्वपक्षीय गटनेत्यांची तातडीने बैठक बोलावून सामोपचाराने तोडगा काढावा. मराठा समाजाला न्याय द्यावा.
विद्यमान आरक्षणाला कोणताही धक्का न लावता सुद्धा मराठा समाजाला आहे त्या स्थितीत आरक्षण देणं सहज शक्य आहे. फक्त कोटा वाढवून घ्यावा लागेल. त्याबाबतची कार्यवाही नंतर करता येईल, कारण केंद्रात आणि राज्यात तुमचंच सरकार आहे. अर्थात तोपर्यंत थांबण्याची आवश्यकता नाही.
संत तुकाराम, महात्मा जोतीराव फुले, छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणासाठी ज्यांना पात्र मानलं आहे त्या गरजवंत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत तातडीने कार्यवाही व्हावी, ही विनंती.
(हेही वाचा: पुन्हा मागितली एका महिन्याची मुदत; सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला )