
मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण होण्यासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांचं आमरण उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा तिसरा दिवस सुरू आहे. आज संभाजीराजे यांची तब्येत बिघडली असून त्यांचा रक्तदाब कमी झाला आहे आणि सारखेची पातळीत घट झाली आहे. असे असूनही त्यांनी औषध घेण्यास नकार दिला आहे. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजेंना चर्चेचे निमंत्रण दिले होते. त्यानंतर मराठा समन्वयक वर्षा बंगल्यावर दाखल झाले होते. वर्षा बंगल्यावरच्या या चर्चेनंतर शिष्टमंडळ संभाजीराजेंच्या भेटीसाठी आझाद मैदानात पोहोचले आहे. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे संभाजीराजे यांच्या भेटीसाठी आझाद मैदानात दाखल झाले आहेत. त्यापूर्वी कार्यकर्त्यांसोबत बोलताना संभाजीराजे म्हणाले की, ‘लेखी आश्वासनाशिवाय उपोषण मागे घेणार नाही.’
नक्की काय म्हणाले होते संभाजीराजे?
संभाजीराजे कार्यकर्त्यांसोबत बोलताना म्हणाले की, ‘पहिलं मूक आंदोलन १६ जूनला कोल्हापुरात झाले होते. त्यानंतर १७ जूनला सरकारने सकारात्मक दृष्टीकोनातून चर्चेसाठी निमंत्रण दिलं. यावेळी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सर्व सचिव उपस्थित होते. त्यावेळी १५ दिवसांंत सर्व गोष्टी मार्गी लावू असं सांगितलं. पण तेव्हा आम्ही दोन महिने घ्या असं म्हणालो. पण दोन महिन्यात काहीच मार्गी लागलं नाही. मग त्यानंतर नांदेडमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं. तरीही सरकारवर दबाव आला नाही. म्हणून रायगड जिल्हाचा दौरा केला. मग त्यानंतर समन्वय, कुटुंबियांना न विचारता स्वतंत्र उपोषण करण्याचा निर्णय घेतला.’
‘छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांकडे पाहिलं आणि आमरण उपोषण सुरू केलं. २५ फेब्रुवारी रोजी ९ वाजता जेवलो. फसवेगिरी करणारा मी माणूस नाही. जोपर्यंत माझ्याकडे लेखी येत नाही तोपर्यंत मी मान्य करणार नाही. लेखी आश्वासनाशिवाय पुढची अॅक्शन घेणार नाही,’ असे संभाजीराजे म्हणाले.