पंढरपूर: कार्तिकी एकादशीला देवेंद्र फडणवीस की अजित पवार विठ्ठल रखुमाईची पूजा कोण करणार अशा चर्चांना उधाण आलं होतं. त्यानंतर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आमंत्रित न केल्याचं समोर आलं. परंतु आता विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. तसंच, पोलिसांनीही महापूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांनी यावं यासाठी सकारात्मकता दर्शवल्याची माहिती आहे. (Maratha Reservation Kartiki Ekadashi Puja by Ajit Pawar Strong opposition to the Maratha Kranti Morcha)
उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा झाली तर आमचा तीव्र विरोध असेल, असं मराठा आंदोलकांचं म्हणणं आहे. त्यामुळे जरी मंदिर प्रशासनाने अजित पवार यांना कार्तिकी पुजेसाठी आमंत्रित केले तरीसुद्धा मराठा आंदोलक मात्र त्याचा कडाडून विरोध करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
कार्तिकी एकादशीची पूजेला जरांगेंना बोलवा
उपमुख्यमंत्र्यांना विरोध करणाऱ्या मराठा समाजातील आंदोलकांनी आता या महापूजेसाठी मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांना निमंत्रित करावे, अशी मागणी केली आहे. अकलूज येथील सकल मराठा मोर्चाचे समन्वयक आणि जरांगे यांच्या आवाहनानंतर 5 दिवस उपोषण करणारे गणेश इंगळे यांनी या मागणीचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.
मंदिर समिती बैठकीत गोंधळ
कार्तिकी पूजेसाठी उपमुख्यमंत्र्यांनी निमंत्रण दिल्यास यात्रा कालावधीत होणाऱ्या प्रकाराला शासन आणि मंदिर समिती जबाबदार राहील असा इशारा मराठा आंदोलकांनी आज मंदिर समितीला दिला. यापूर्वी मराठा आरक्षण आंदोलनामुळे 2018 साली तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आषाढीच्या पूजेला बंदी करुन येऊ दिले नव्हते. तशीच वेळ पुन्हा येईल असा इशारा रामभाऊ गायकवाड यांनी दिला.
मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला मुदत दिलेली असली तरी आम्ही पंढरपूरमध्ये मंत्री, आमदार, खासदार यांची बंदी उठवलेली नाही. आधी आरक्षण देऊन तुम्ही पूजेला आल्यास आम्ही फुले टाकून स्वागत करू, मात्र बळाचा वापर करून आल्यास आम्ही येऊ देणार नाही आणि होणाऱ्या परिणामाला सरकार जबाबदार असेल असा इशारा मराठा आंदोलक किरणराज घाडगे आणि संदीप मांडवे यांनी दिला.
(हेही वाचा: हिंमत असेल तर…; मुंबईतील प्रदूषणावरुन आदित्य ठाकरेंचे सरकारला ‘हे’ आव्हान )