Homeमनोरंजनकलावंत बोलले! मराठी कलाकाराने केली भिंडेंच्या अटकेची मागणी, म्हणाले - "या भयानक..."

कलावंत बोलले! मराठी कलाकाराने केली भिंडेंच्या अटकेची मागणी, म्हणाले – “या भयानक…”

Subscribe

राज्यातच नव्हे तर देशात खळबळजनक घटना घडत असताना याबाबत मात्र कोणत्याही मराठी कलावंताने आपले मत व्यक्त केलेले नाही. पण संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात मराठीतील अभिनेते आणि कवी अशी ओळख असलेले किशोर कदम सौमित्र यांनी संताप व्यक्त केला आहे.

मुंबई : शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान संस्थेचे प्रमुख मनोहर भिडे म्हणजेच संभाजी भिडे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले. ज्यामुळे त्यांच्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाकडून आंदोलन करण्यात आले. भिडेंनी वक्तव्य केल्यानंतर त्यांच्या विरोधात राज्यात पुणे आणि यवतमाळ, अमरावती येथे आंदोलन करण्यात आले. अमरावती येथे तर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यातच नव्हे तर देशात खळबळजनक घटना घडत असताना याबाबत मात्र कोणत्याही मराठी कलावंताने आपले मत व्यक्त केलेले नाही. पण संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात मराठीतील अभिनेते आणि कवी अशी ओळख असलेले किशोर कदम सौमित्र यांनी संताप व्यक्त केला आहे. त्यांनी थेट मनोहर भिडे या भयानक विकृत वृत्तीच्या माणसाला अटक करावी अशी मी एक कलावंत म्हणून मागणी करीत आहे, असे आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. (Marathi actor Kishore Kadam demanded the arrest of Sambhaji Bhide)

हेही वाचा – Bhide Controversial Statement : भिडेंविरोधात ठाण्यात काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर, ‘असा’ केला निषेध

“अजित पवारांना उपमुख्यमंत्री करत भिडे वृत्तीच्या माणसांना बोलतं करून अजित पवारांना हतबल करत राहणं हा राजकारणाचा भाग आहे. आपण सगळेच या राजकारणामुळे कोंडीत सापडलो आहोत. आता हा मुद्दा शिंदेजी आणि अजितजी कसे हाताळतात हा नसून माननीय फडणविसजी या दोघांची मजा बघत बसणार नाहीत अशी अपेक्षा आहे. तसं नसेल तर तात्काळ संभाजी नव्हे , मनोहर भिडे या भयानक विकृत वृत्तीच्या माणसाला अटक करावी अशी मी एक कलावंत म्हणून मागणी करीत आहे. किशोर कदम सौमित्र.” अशी पोस्ट किशोर कदम यांनी केली आहे. या पोस्टमधून सरकारला देखील फटकारले आहे. तर राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीवर देखील त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

महात्मा गांधींबद्दल संभाजी भिडे नेमकं काय म्हणाले?

संभाजी भिडे यांचा अमरावतीमधील बडनेरा मार्गावरील जय भारत मंगलम या सभागृहात व्याख्यानाचा कार्यक्रम झाला. या कार्यक्रमातील संभाजी भिडे यांची ऑडिओ क्लीप सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. या क्लीपमध्ये संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी अत्यंत आक्षेपार्ह दावे केले आहेत. त्यात म्हटले आहे, ‘मोहनदास हे करमचंद यांच्या चौथ्या पत्नीचे पुत्र होते. करमचंद हे ज्या मुस्लीम जमीनदाराकडे कामाला होते, त्याच जमीनदाराची मोठी रक्कम चोरून ते पळून गेले होते. त्यामुळे त्या चिडलेल्या मुस्लीम जमीनदाराने करमचंद यांच्या पत्नीलाच पळवून घरी आणले. त्यांच्याशी पत्नीसारखा व्यवहार केला. तीन वर्ष करमचंद फरार होते. याचा काळात मोहनदास यांचा जन्म झाला. त्यामुळे करमचंद गांधी, हे मोहनदास यांचे खरे वडील नसून मोहनदास त्याच मुस्लीम जमीनदाराचे पुत्र आहेत.’ मोहनदास यांचा सांभाळ व शिक्षणही त्याच मुस्लीम जमीनदाराने केले असल्याचे ठोस पुरावे उपलब्ध असल्याचा दावाही संभाजी भिडे यांनी केला.